भारताने डोपिंग, क्रीडा प्रशासनाकडे लक्ष द्यावे : आयओसी
वृत्तसंस्था/ लॉसेन
भारत ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना, आयओसीने डोपिंग, प्रशासन, क्रीडा कामगिरी यावर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक संस्थेने म्हटले आहे की ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापूर्वी देशाला प्रशासकीय, नियामक आणि क्रीडा पैलूंवर बरेच काही करायचे आहे.
मंगळवारी येथील ऑलिम्पिक मुख्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर (आयओसी) योजनांची रूपरेषा मांडत असताना भारतामध्ये भरविण्यात येणाऱ्या 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी एका भारतीय शिष्टमंडळाने जोरदार तयारी केली आणि अहमदाबादला यजमान शहर म्हणून अधिकृतपणे सादर केले. परंतु आयओसीचा प्रतिसाद स्पष्ट होता. मास्टरप्लान तयार करण्यापूर्वी तुमचे घर व्यवस्थित करा, असे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीदरम्यान भारताने मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यास रस दाखवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या बैठकीत आयओसीने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनमधील प्रशासनातील समस्या, डोपिंगचा वाढता धोका आणि ऑलिम्पिकमध्ये देशाची खराब कामगिरी याबद्दल चिंता व्यक्त केली. गेल्या वर्षी पॅरिस गेम्समध्ये, भारत फक्त सहा पदकांसह 71 व्या स्थानावर राहिला.
भारत भविष्यातील ऑलिम्पिकचे आयोजन करण्याच्या दाव्यासाठी तयारी करत असला तरी, देशाला प्रथम या मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, हे अगदी स्पष्टपणे कळवण्यात आले आहे. या बैठकीतून हा मोठा निष्कर्ष होता, असे या बैठकीदरम्यान असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लॉसेनला गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व गुजरातचे गृह आणि क्रीडा मंत्री हर्ष संघवी आणि आयओए अध्यक्ष पीटी उषा यांनी केले. या बैठकीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारमधील उच्चपद, नोकरशहा, आयओएचे वरिष्ठ अधिकारी, खाजगी सल्लागार आणि कॉर्पोरेट अधिकारी यांचा समावेश होता. आयओए प्रमुख उषा यांनी चर्चेबद्दल बैठकीतील चर्चेबद्दल सांगण्याचे टाळले. शिष्टमंडळाने म्हटले आहे की, त्यांनी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक खेळांच्या भविष्यातील आवृत्तीचे आयोजन भारताने करण्याची संधी आणि व्यवहार्यता शोधली आहे. या निवेदनात वर्ष निर्दिष्ट केलेले नाही परंतु भारतीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी म्हटले आहे की त्यांना 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची आशा आहे.
भारताच्या दाव्याचे यश आयओसीने अधोरेखित केलेल्या मुद्यांवर किती लवकर लक्ष केंद्रित केले जाते, यावर अवलंबून असेल. याशिवाय, आयओसीने त्यांच्या नवीन अध्यक्षा किर्स्टी कोव्हेंट्री यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या यजमान निवड प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय भारताला सर्व अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक वेळ देईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ऑक्टोबर 2024 पासून, प्रशासकीय कोंडीमुळे आयओसीने भारतीय संघटनेला दिले जाणारे खेळाडू कल्याण अनुदान थांबवले आहे. जागतिक संघटनेने म्हटले आहे की ते परिस्थिती सुधारेपर्यंत निधी देणार नाहीत. प्रायोजक करारांपासून ते कथित आर्थिक गैरव्यवस्थापन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रघुराम अय्यर यांची नियुक्ती या समस्या, तरी अशा विविध मुद्यांवरून आयओए कार्यकारी परिषदेशी वाद सुरू आहेत.
जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेच्या 2023 च्या वार्षिक अहवालानुसार उपलब्ध असलेली नवीनतम आवृत्तीत प्रमुख क्रीडा देशांमध्ये बंदी घातलेल्या पदार्थांच्या सेवनाचा दर भारतात सर्वाधिक होता. गेल्या वर्षीच्या एका वेगळ्या अभ्यासातून असे दिसून आले की अल्पवयीन मुलांमध्ये सर्वाधिक डोपिंग प्रकरणे असलेला देश म्हणून भारत रशियानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. मे 2025 पर्यंत गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये डोपिंग गुन्हेगारांच्या यादीत भारताला केनियानंतर दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की डोपिंगच्या धोक्याला तोंड देण्यासाठी योजना आखल्या जात आहेत आणि आयओएमधील प्रशासन समस्या प्रामुख्याने सीईओच्या नियुक्तीवरील वाद लवकरच सोडवला जाईल, अशी आशा व्यक्त केली.