सॅफ चषक फुटबॉलमध्ये भारताचे मालदीववर अकरा गोल
फातोर्डा स्टेडियमवर स्पर्धेला सुरूवात; नेपाळचा भूतानवर विजय
त.भा. । क्रीडा प्रतिनिधी
मडगाव
सॅफ महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमान भारत आणि नेपाळने प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळविले. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर झालेल्या लढतीत भारताने मालदीवचा 11-0 असा फडशा पाडला तर त्यापूर्वी झालेल्या लढतीत नेपाळने विजयाचे पूर्ण तीन गुण कमावताना भूतानला एकमेव गोलने पराभूत केले. नेपाळचा एकमेव गोल भूतानच्या एडॉन दोर्जी हिच्याकडून सेल्फ गोलने झाला. भारताला या विजयाने तीन गुण मिळाले. भारतासाठी अवेका सिंगने चार, प्रियांगका देवी व करिष्मा शिरवईकरने प्रत्येकी दोन तर प्यारी शाशा, संगीता बासफोर व ग्रेस डोगमईने प्रत्येकी एक गोल केला.
सामन्याच्या 11व्या मिनिटाला भारताने आपला पहिला गोल केला आणि आघाडी घेतली. संगीता बासफोरने दिलेल्या पासवर प्रियांगका देवीने मालदीवच्या गोलरक्षकाला भेदले आणि चेंडू जाळीत सारला. त्यानंतर भारताने आक्रमक खेळ करून मालदीवच्या बचावळीवर सतत दबाव कायम ठेवला. अशाच एक प्रयत्नात प्रियांगका देवीने अवेका सिंगच्या पासवर दुसरा गोल केला आणि भारताची आघाडी दोन गोलानी वाढवली.
त्यानंतर 28व्या मिनिटाला प्यारी शाशाने लांब पल्ल्यावरून भारताचा तिसरा तर 34व्या मिनिटाला अवेका सिंगने चौथा गोल केला. 38व्या मिनिटाला ग्रेस डोगमेईने भारताचा पाचवा गोल केला व मध्यंतरापर्यंत आघाडी पाचवर नेली. दुसऱ्या सत्रात भारताने अधिक आक्रमक खेळ केला.
प्रथम करिष्मा शिरवईकरने सहावा गोल केल्यानंतर संगीता बासफोरने एक तर करिष्माने आपला दुसरा आणि अवेका सिंगने सामन्याच्या 66व्या व 70व्या मिनिटाला दोन गोल करून भारताची आघाडी 10 गोलांनी नेली. शेवटी सामना संपण्यास चार मिनिटे शिललक असताना अवेका सिंगने आपला चौथा आणि भारताच्या अकराव्या गोलाची नोंद केली.