भारत-रशिया महिला फुटबॉल संघात तीन मैत्रीपूर्ण सामने
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचा 17 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल संघ रशियाच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात रशियाच्या महिला संघासमवेत तीन मित्रत्वाचे फुटबॉल सामने स्वॉचीमध्ये होणार आहेत. हे सामने 11, 14, 17 एप्रिल रोजी खेळविले जाणार असून या दौऱ्यासाठी 23 सदस्यांचा भारतीय महिला फुटबॉल संघ निवडण्यात आला आहे.
चालु वर्षी होणाऱ्या एएफसी 17 वर्षांखालील वयोगटातील महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी आतापासूनच भारतीय महिला फुटबॉल संघाला सरावाच्या उद्देशातून रशियाचा हा दौरा आयोजित केला असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली. सदर स्पर्धा चीनमध्ये होणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघ सोमवारी रात्रीच रशियात दाखल झाला आहे. गेल्या महिन्यात भारतीय 17 वर्षांखालील महिला फुटबॉल संघाने चीनमधील येनगॉन दौरा केला होता आणि त्या दौऱ्यात दोन मित्रत्वाचे सामने झाले होते. पण या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. महिलांच्या आशिया चषक एएफसी 17 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना 2 मे रोजी ऑस्ट्रेलियाबरोबर, 5 मे रोजी दुसरा सामना जपानबरोबर तर 8 मे रोजी तिसरा सामना लेबेनॉनबरोबर होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा ब गटात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय महिला फुटबॉल संघ, : गोलरक्षक-मुन्नी, शेलना साजित, तम्फसेना देवी, बचावफळी- अलेना देवी, अलिशा लिंगडोह, दिव्यानी लिंडा, एलिझाबेथ लाक्रा, जॉयस्नी चानु, रितू बादीक, तानिया देवी, मध्यफळी-अभिस्ता बासनेत, अल्वा देवी सेंजम, बोनिफिलीया शुलाई, जुलन एन., प्रितिका बर्मन, रेडीमादेवी, थंडोमनी बासेकी, आघाडीफळी- अनुष्का कुमारी, अन्विता रघुरामन, जोया, ऑलिव्हा चानु, पर्ल फर्नांडीस आणि व्हॅलेना फर्नांडीस.