भारताकडून बांगलादेशची सवलत रद्द
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताकडून बांगलादेशला मिळणारी ‘ट्रान्सशिपमेंट’ सवलत आता रद्द करण्यात आली आहे. बांगलादेशने चीनशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न चालविला असून आपल्या क्षेत्रात चीनला आमंत्रित केले आहे यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून याचा बांगलादेशला तोटा होणार हे निश्चितपणे मानले जात आहे.
बांगलादेशचे सर्वोच्च नेते मोहम्मद युनुस यांनी काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा केला होता. चीनने ईशान्य भारत ताब्यात घ्यावा. या भागात आपली आर्थिक व्यवस्था निर्माण करावी. बांगला देश हा बंगालच्या उपसागराचा एकमेव स्वामी असल्याने आपण चीनला याकामी साहाय्य करु, अशी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषा त्यांनी चीन दौऱ्यावर केली होती. त्यामुळे भारत संतप्त झाला होता. बांगलादेशला युनुस यांच्या विधानांची किंमत मोजवयास लावण्याची तयारी भारताने केलाr. त्यामुळे बांगलादेशला दिलेली ही सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बांगलादेशला भूतान, नेपाळ आणि म्यानमार या देशांशी व्यापार करणे अवघड होणार असून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची हानी होणार आहे.
आलेला माल पोहचविणार
बांगलादेशशी संबंधित जो माल ही सवलत रद्द करण्यापूर्वी बंगालच्या उपसागरात वाहतून नौकांच्या माध्यमातून पोहचलेला आहे, त्यासंबंधी कारवाई केली जाणार नाही. पूर्वीच्या व्यवस्थेनुसार हा व्यवहार केला जाईल. मात्र, भविष्यकाळात बांगला देशला ही सुविधा भारताकडून दिली जाणार नाही, असे स्पष्ट होत आहे.
भारताच्या आश्वासनाचे काय...
भारताने बांगलादेशला दिलेली ही सवलत काढून घेतली असली तरी या निर्णयामुळे काही प्रश्नही निर्माण होतात. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या अनुसार अशी सवलद देणे भारताचे कर्तव्य आहे. बांगलादेश यासंबंधात भारताकडे अशी सवलत देण्याचा आग्रह धरु शकतो. तथापि, भारताच्या म्हणण्यानुसार मोहम्मद युनुस यांनी जी भाषा भारताच्या विरोधात केली आहे, ती पाहता या देशाला असा धडा शिकविण्याची आवश्यकताच होती. जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांपेक्षा भारताला त्याचा आत्मसन्मान आणि त्याची भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमत्व यांचे महत्व अधिक प्रमाणात वाटते. त्यामुळे असा कठोर निर्णय बांगलादेशाच्या विरोधात घेणे हा भारताचा अधिकारच आहे, अशी भारताची भूमिका असून ती जगासमोर स्पष्टपणे मांडली गेली आहे.
ट्रान्सशिपमेंट सुविधा म्हणजे काय...
ट्रान्सशिपमेंट याचा अर्थ एका जहाजातील माल दुसऱ्या जहाजात घेणे असा आहे. एखाद्या देशाकडे पुरेशा प्रमाणात जहाजे नसतील तर त्या देशाचा माल अन्य देशांच्या मालवाहू नौकांमधून अंतिम बंदरापर्यंत नेला जातो. बांगलादेशला म्यानमार, नेपाळ आणि इतर काही देशांशी व्यापार करण्यासाठी भारताच्या मालवाहू नौकांचे साहाय्य घ्यावे लागते. याला ट्रान्सशिपमेंट सवलत असे म्हणतात.