For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे आयसीसी टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान कायम

06:43 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचे आयसीसी टी 20 क्रमवारीतील अव्वल स्थान कायम
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

दुबई : तीन वेळच्या विश्वचषक विजेत्या भारताने मंगळवारी आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

मार्च महिन्यात जेव्हा भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते तेव्हा भारताने इतिहास रचला होता. टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद यशस्वीपणे राखणारा आणि विक्रमी तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकणारा पहिलाच संघ बनण्याचा मान भारताने त्यावेळी मिळवला होता. ताज्या क्रमवारीमध्ये मे, 2025 पासून खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांना 100 टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील सामन्यांना 50 टक्के महत्त्व (गुण) देण्यात आले आहे, असे ‘आयसीसी’ने आपल्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.

Advertisement

275 गुणांसह अव्वल स्थानी असलेल्या भारताची इंग्लंडवरील आघाडी केवळ एका गुणाने कमी झाली आहे, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर असून ते इंग्लंडच्या अधिक जवळ पोहोचले आहेत, असेही त्यात पुढे म्हटले आहे. दोन वेळा विजेतेपद मिळवलेल्या इंग्लंडकडे 262 रेटिंग गुण आहेत, तर एकदा विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाकडे 258 गुण आहेत.

एकंदरित पाहता आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील पहिल्या सात संघांच्या स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंड (247), दक्षिण आफ्रिका (244), पाकिस्तान (240) आणि वेस्ट इंडिज (233) हे संघ अनुक्रमे पुढील स्थानांवर कायम आहेत. मात्र श्रीलंकेने (221) सहा रेटिंग गुण गमावल्यामुळे त्यांची घसरण होऊन ते नवव्या स्थानावर पोहोचले आहेत, तर बांगलादेशने (225) एका स्थानाची प्रगती करत आठवे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तान (220) दहाव्या स्थानावर असून त्यांचे आणि श्रीलंकेचे गुण जवळजवळ समान पातळीवर आहेत. झिम्बाब्वे आणि आयर्लंड अनुक्रमे 11 व्या आणि 12 व्या स्थानावर आहेत. उत्तर अमेरिकेतील क्रिकेटची एक उदयोन्मुख शक्ती असलेल्या अमेरिकेने सहा गुणांची कमाई करत दोन स्थानांची झेप घेतली आहे. यामुळे ते 13 व्या स्थानावर पोहोचले असून त्यांनी अनुक्रमे 14 व्या आणि 15 व्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्स आणि स्कॉटलंडला मागे टाकले आहे, असे आयसीसीने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.