For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युएन’मध्ये भारताची पाकिस्तानला फटकार

06:58 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘युएन’मध्ये भारताची पाकिस्तानला फटकार
Advertisement

पाकिस्तानने आळवला काश्मीर मुद्दा : भारताच्या प्रतिनिधीकडून सडेतोड प्रत्युत्तर

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत (युएनजीए) केलेल्या भाषणानंतर भारताने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवाद, धार्मिक असहिष्णुता, लोकशाही हक्क आणि काश्मीर प्रश्नावरून संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी समितीच्या प्रथम सचिव पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. तसेच ठदहशतवादाला खतपाणी घालत राहिल्यास पाकिस्तानला याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशाराही जागतिक व्यासपीठावरून दिला.

Advertisement

दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लोकशाही हक्क आणि अल्पसंख्याक मुद्यांवर संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यांना भारताने कडक शब्दात फटकारले आहे. पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप करतानाच जम्मू-काश्मीरबाबतचा पाकिस्तानचा युक्तिवाद फेटाळून लावला. भारताने पाकिस्तानच्या लोकशाही, मानवाधिकार आणि धार्मिक असहिष्णुतेच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी देशाच्या 27 व्या घटनादुरुस्तीचा आणि तेथील ‘खऱ्या शासका’ला दिलेल्या आजीवन संरक्षणाचाही उल्लेख केला. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाला असलेला आपला पाठिंबा थांबवत नाही, तोपर्यंत हा करार स्थगित राहील, यावर भारत ठाम आहे, असे ठामपणे भारताकडून सांगण्यात आले.

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग

शाहबाज शरीफ यांनी आपल्या सुमारे 23 मिनिटांच्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. दक्षिण आशियामध्ये 2025 च्या संघर्षासारखी परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी काश्मीर प्रश्नाचा न्याय्य आणि योग्य तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. यावर भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत आणि इतर संयुक्त राष्ट्र मंचांवर काश्मीरवरील पाकिस्तानचे दावे वारंवार फेटाळून लावताना जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य आणि अहस्तांतरणीय भाग होता, आहे आणि नेहमीच राहील, अशी भूमिका कायम ठेवली आहे.

पाकिस्तानचे खोटे धोरण सर्वश्रुत

भारताला आशा आहे की आमसभा पाकिस्तान आणि त्याच्या धोरणांचे मूल्यांकन त्यांच्या प्रतिनिधीने केलेल्या दाव्यांवर नव्हे, तर त्यांच्या खऱ्या स्वरूपावर आधारित करेल, असेही भारतीय प्रतिनिधीने म्हटले. आम्हाला विश्वास आहे की ही सभा पाकिस्तान आणि त्याच्या धोरणांना जसे ते प्रत्यक्षात आहेत तसे समजून घेईल, जसे त्याचे प्रतिनिधी खोटेपणाने सादर करतात तसे नव्हे. वर्षानुवर्षे खोट्या गोष्टींची पुनरावृत्ती केल्याने त्या खऱ्या ठरत नाहीत, अशी कोपरखळीही पेटल गेहलोत यांनी मारली.

जयशंकर यांनी दाखवला पाकिस्तानी पत्रकाराला ‘आरसा’

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81 व्या अधिवेशनादरम्यान एका पत्रकार परिषदेत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने वातावरणच बदलून टाकले. न्यूयॉर्कमध्ये एका पत्रकार परिषदेत एस. जयशंकर बोलत असताना, एका पाकिस्तानी पत्रकाराने दहशतवादाशी संबंधित प्रश्न विचारून त्यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एस. जयशंकर किंचित हसले आणि मग त्यांनी सडेतोड उत्तर दिले. एस. जयशंकर म्हणाले, ‘एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारत आहे.’ त्यानंतर ते हसले आणि निघून गेले. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सीमापार दहशतवादावर कारवाईची मागणी

भारताने पाकिस्तानला सीमापार दहशतवादाविरोधात ‘ठोस कारवाई’ करण्याचे वारंवार आवाहन केले आहे. भारताची भूमिका विशेषत: एप्रिल 2025 मधील 26 निरपराध लोकांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केंद्रित आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे सीमापार दहशतवादाला प्रत्युत्तर दिले. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी किंवा पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.

शाहबाज यांच्याकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 81 व्या संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर न्याय्य आणि निष्पक्ष तोडगा काढण्याची मागणी केली. काश्मिरी जनता संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली मुक्त आणि भेदभावरहित सार्वमताच्या आश्वासनाची वाट पाहत आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर, शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आणि 2025 च्या संघर्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘वेळेवर केलेल्या हस्तक्षेपा’चे कौतुक केले. तसेच आपल्या भाषणात सिंधू पाणी कराराचाही उल्लेख केला. पाकिस्तानच्या वाट्याला येणारे पाणी थांबवण्याचा, त्यात अडथळा आणण्याचा किंवा ते वळवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचे कृत्य मानले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.