अंधांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकमध्ये जाण्यास भारताचा नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंधांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सीएबीआयचे सरचिटणीस शैलेंदर यादव यांनी सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने परवानगी नाकारल्याने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संघ सध्या नवी दिल्लीत या स्पर्धेची तयारी करीत आहे. 21 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ वाघा बॉर्डरमधून पाकला प्रयाण करणार होता. हा निर्णय निराशाजनक असल्याचे सांगत यादव म्हणाले की, महिनाभरापासून या स्पर्धेसाठी आपले खेळाडू कसून तयारी करीत आहेत, त्यामुळे हा निर्णय त्यांच्यासाठी निराशाजनकच आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याशी औपचारिक चर्चा करताना त्यांनी परवानगी नाकारल्याचे समजले. त्याबाबत आम्हाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. बुधवारी याबाबत आम्हाला सांगितले जाणार होते, असेही यादव म्हणाले.
गेल्या 25 दिवसांपासून खेळाडू या स्पर्धेची कसून तयारी करीत आहेत. पण आता स्पर्धेतच भाग घेता येणार नसल्याने ते निराश झाले आहेत. त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक ठरणारा आहे, असेही ते म्हणाले. अंधांचे क्रिकेट एकदम वेगळ्या प्रकारचे आणि खूपच आव्हानात्मक असते. त्याला कठोर ट्रेनिंग आणि जबरदस्त समर्पण वृत्तीची गरज लागते. निवडलेल्या खेळाडूंसाठी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची ही एकच संधी होती. कारण चार वर्षांनंतर त्यांना संधी मिळू शकेल, याची खात्री नसते. सरकारने अगदी अयोग्यवेळी हा राजकीय निर्णय घेतला आहे. कारण त्यात बरीच गुंतवणूक झाली असून तयारीही पूर्ण झाली आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
भारतीय पुरुष संघाने आजवर या स्पर्धेत घवघवीत यश मिळविले असून 2012, 2017, 2022 असे सलग तीनदा भारताने जेतेपद पटकावले आहे.