भारताला मिळाली एस-400 यंत्रणा
रशियाकडून खरेदी, संरक्षण क्षमतेत होणार वाढ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताला रशियाकडून अत्याधुनिक एस-400 ही संरक्षण यंत्रणा मिळाली आहे. यापूर्वी भारताने अशाच तीन यंत्रणा विकत घेतल्या आहेत. ही चौथी यंत्रणा आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. ही यंत्रणा शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा. ड्रोन्सचा आणि युद्ध विमानांचा आकाशातच नाश करण्यास सक्षम आहे. भारताच्या सर्व सीमांवर आता ही यंत्रणा नियुक्त करण्यात येणार आहे. रशियाकडून काही दिवसांपूर्वी ही यंत्रणा आणि तिचे सर्व सुटे भाग भारतात पोहचले आहेत. लवकरच ही यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. या चौथ्या यंत्रणेत 16 कवचयुक्त वाहने असून कमांड आणि नियंत्रण युनिट, अत्याधुनिक रडार आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपक, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रे यांचा समावेश आहे. या यंत्रणेतील क्षेपणास्त्रांची एकंदर संख्या 128 आहे. भारताने 2018 मध्ये रशियाशी अशा पाच यंत्रणा खरेदी करण्याचा करार केला आहे. या पाच यंत्रणांपैकी चार यंत्रणा आत्तापर्यंत मिळाल्या असून पाचवी यंत्रणा येत्या एक वर्षात मिळणार आहे. आतापर्यंत या यंत्रणेच्या माध्यमातून भारताने रशियाकडून 60 क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि 6 हजारांहून अधिक क्षेपणास्त्रे विकत घेतली आहेत.
भूमीवरुन आकाशात...
या यंत्रणेच्या माध्यमातून शत्रूच्या आकाशातील लक्ष्यांचा भेद करता येतो. शत्रूची विमाने, ड्रोन्स, क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे किंवा अन्य शस्त्रास्त्रे विशिष्ट टप्प्यात येताच या यंत्रणेत त्यांची नोंद होते आणि ही यंत्रणा कार्यरत होते. शत्रूच्या आकाशातून येणाऱ्या शस्त्राचा अचूक वेध घेऊन या यंत्रणेतून क्षेपणास्त्र डागले जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या शस्त्रावर अचूक आदळते आणि त्याचा आकाशातच नाश करते. त्यामुळे भूमाग आणि मानवबळ यांचे संरक्षण केले जाते. या यंत्रणेमुळे भारताच्या सीमा आणि वायू क्षेत्र आता अधिक सुरक्षित झाले आहे, असे मत तज्ञ व्यक्त करतात.
‘सिंदूर अभियाना’चे यश
पहलगाम येथे पाकिस्तानने पेलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ‘सिंदूर अभियाना’च्या माध्यमातून मोठाच दणका दिला. या अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘सिंदूर अभियाना’त या एस-400 यंत्रणेचा महत्वाचा सहभाग होता. या यंत्रणेमुळे पाकिस्तानने भारताच्या क्षेत्रात सोडलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा भारताच्या संरक्षण दलांनी नाश केला. त्यामुळे भारताच्या सीमेलगतच्या नागरी वस्त्यांचे मोठ्या प्रमाणात संरक्षण झाले. या यंत्रणेचा प्रभाव असा सिद्ध झाला. त्यानंतर भारताला रशियाने त्वरित या यंत्रणा पुरविण्यास प्रारंभ केला आहे.