For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2030 राष्ट्रकुलच्या यजमानपदास भारत सज्ज

06:42 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
2030 राष्ट्रकुलच्या यजमानपदास भारत सज्ज
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

एका महिन्यापूर्वी यजमानपदाच्या हक्कांची खात्री झाल्यानंतर भारताच्या 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या आयोजनावरील दाव्याला आज बुधवारी ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत औपचारिक मान्यता मिळणार आहे. हा जागतिक बहुक्रीडा केंद्र बनण्याच्या देशाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताने या खेळांचे शेवटचे आयोजन 2010 मध्ये दिल्लीत केले होते. परंतु यावेळी सदर स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहेत.

बुधवारी होणाऱ्या महासभेत राष्ट्रकुल क्रीडा मंडळाने आधीच शिफारस केलेल्या गोष्टींवर मंजुरीची मोहोर उमटवण्याची औपचारिकता पार पडेल. या शिफारसीनंतर राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांकन समितीच्या देखरेखीखालील प्रक्रिया पार पडली. त्यात तांत्रिक बाबी, खेळाडूंचा अनुभव, पायाभूत साधनसुविधा, प्रशासन आणि राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांशी ठिकाण किती सुसंगत आहे या दृष्टिकोनातून दावेदार शहराचे मूल्यांकन करण्यात आले. 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या आयोजनाच्या बाबतीत भारताला नायजेरियन शहर अबुजाकडे स्पर्धा करावी लागत होती. परंतु राष्ट्रकुल क्रीडा मंडळाने 2034 च्या आवृत्तीसाठी सदर आफ्रिकन राष्ट्राचा विचार करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

शिफारसीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अभिनव प्रसारण कार्यक्रम होईल, असे कॉमनवेल्थ स्पोर्टने म्हटले आहे. त्यांनी स्कॉटिश राजधानीत दिवसभरात काय कार्यक्रम होतील त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सौपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा असून भारताचे प्रतिनिधीत्व सहसचिव (क्रीडा) कुणाल, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आणि गुजरातचे क्रीडामंत्री हर्ष संघवी व इतर करतील.

2010 मध्ये या खेळांच्या आयोजनासाठी भारताने जवळपास 70,000 कोटी ऊपये खर्च केले होते, जे सुऊवातीच्या 1600 कोटी ऊपयांच्या अंदाजापेक्षा खूपच जास्त होते. गेल्या काही काळापासून महत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि इच्छुक यजमान शोधण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या चार वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत 72 देशांचे खेळाडू सहभागी होतात. त्यापैकी बहुतेक एकेकाळच्या ब्रिटिश वसाहती आहेत. 2036 मध्ये ऑलिंपिकचे यजमान होण्याच्या भारताच्या प्रयत्नात या खेळांचे यजमानपद मिळवणे हा एक महत्त्वाचा टप्पा असेल. ऑलिंपिक देखील अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.

अलीकडच्या काही महिन्यांत अहमदाबादने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप, आशियाई अॅक्वेटिक्स चॅम्पियनशिप आणि फुटबॉलच्या एएफसी 17 वर्षांखालील आशियाई चषक 2026 पात्रता स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. पुढील वर्षी ते आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि आशियाई पॅरा-तिरंदाजी चषकाचे आयोजन करणार आहेत. 2029 मध्ये जागतिक पोलिस आणि अग्निशामक खेळ अहमदाबाद, गांधीनगर आणि एकता नगर येथे आयोजित केले जातील. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह हे सध्या विकसित होत असलेल्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे आणि 1 लाख प्रेक्षक क्षमतेच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या व्यतिरिक्त एक जलतरण केंद्र आणि फुटबॉल स्टेडियम तसेच इनडोअर खेळांसाठी दोन मैदाने सामावून घेण्याच्या दृष्टीने त्याची रचना केलेली आहे. या संकुलात 3,000 लोकांना सामावून घेऊ शकणारे एक खेळाडूंचे ग्राम देखील बांधले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.