अफगाणविरुद्ध ‘क्लीन स्वीप’साठी भारत सज्ज
कर्णधार रोहित शर्माकडून चांगल्या डावाची अपेक्षा, गोलंदाजीत कुलदीप यादव वा आवेश खानला संधी मिळणे शक्य
वृत्तसंस्था/ बेंगळूर
मालिका आधीच जिंकलेली असल्याने आज बुधवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारत आपली संघरचना अधिक परिपूर्ण बनविण्यास उत्सुक असेल. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून अखेरीस धावा भरभरून येतील अशी आशाही संघ व्यवस्थापनाकडून बाळगण्यात येईल. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वीचा भारताचा हा शेवटचा टी-20 सामना आहे आणि मोहाली व इंदूरमधील विजयादरम्यान दिसून आलेली तीव्रता कुठल्याही स्थितीत कमी न देण्याकडे संघ व्यवस्थापनाचा कल असेल.
भारताने दोन्ही सामन्यांत 6 गडी राखून मिळविलेल्या विजयांनी त्यांची अतिआक्रमक मानसिकताही दाखवून दिलेली आहे. त्याच्या जोरावर त्यांनी अनुक्रमे 17.3 षटकांत 159 आणि 15.4 षटकांत 173 धावा केल्या. यापूर्वी टी-20 मध्ये संथ सुरुवात करून अंतिम टप्प्यात गती भरपूर वाढविण्याकडे कल राहायचा. पण त्या पूर्वीच्या दृष्टिकोनापासून संघाने फारकत घेतली असल्याचे यातून दिसून आले आहे. शिवम दुबे आणि विराट कोहली यांच्यापेक्षा अधिक प्रखरपणे ते कुणीही दाखवून दिलेले नाही. कोहली इंदूर येथे 14 महिन्यांनंतर भारतासाठी टी-20’ सामन्यामध्ये खेळत होता. परंतु त्याने 181 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूंत 29 धावा केल्या.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब-उर-रेहमानला विराटने सात चेंडूंत 18 धावा फटकावल्या. त्याच्याविऊद्ध त्याने 257 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. हे त्याच्या छोट्या, पण महत्त्वपूर्ण खेळीचे सर्वांत उल्लेखनीय वैशिष्ट्या होते. कारण कोहली हा नेहमी फिरकीच्या विरोधात थोडा संथपणे सुरुवात करणारा फलंदाज राहिलेला आहे. परंतु यावेळी त्यात बदल करून संघाच्या बदललेल्या दृष्टिकोनात योगदान देण्याची तत्परता त्याने दाखवली.
गेल्या वर्षी मलाहाइड, डब्लिन येथे आयर्लंडविऊद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडले गेल्यानंतर शिवम दुबे तीन वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा भारतीय संघात दिसला होता. त्यानंतर आशियाई क्रीडास्पर्धेत खेळल्यावर दुबेला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मालिकांसाठीच्या संघात मात्र स्थान मिळू शकले नव्हते. अशा प्रकारे त्याचे स्थान अस्थिर राहिलेले असले, तरी ही परिस्थिती दुबेला थिंक टँकने ठरवलेल्या मार्गावर दौडण्यापासून रोखू शकलेली नाही. दुखापतग्रस्त स्टार फिरकी गोलंदाज रशिद खानविना मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानला त्याची दोन जलद अर्धशतके खूप जड गेली.
सलामीवीर यशस्वी जैस्वालने मोहालीतील पहिला सामना दुखापतीमुळे गमावला होता. त्यानेही मागील सामन्यात झटपट अर्धशतक झळकावून संघाचा दृष्टिकोन आत्मसात करण्याची चांगली तयारी दर्शवली आहे. या तिघांवर संघ व्यवस्थापनाची आजच्या सामन्यातही नजर असेल. या अनेक सकारात्मक गोष्टींमध्ये ठळकपणे दिसून आलेली नकारात्मक बाब म्हणजे रोहितला आलेले अपयश आहे. पहिल्या सामन्यात शुभमन गिलसोबत गोंधळ उडाल्यानंतर तो धावबाद झाला, तर वेगवान गोलंदाज फझलहक फाऊकीच्या चेंडूच्या टप्प्याविषयीचा अंदाज चुकल्याने इंदूरमध्ये त्याला परत जावे लागले. दोन सामन्यांतून दोन धावा ही रोहितची कामगिरी संघ व्यवस्थापनाला चिंतेत पाडणार नसली, तरी त्याने मालिकेची समाप्ती चांगल्या खेळीने केलेली पाहणे त्यांना आवडेल.
भारताच्या फलंदाजी विभागात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नसली, तरी कुलदीप यादव आणि आवेश खान यांना थिंक टँक खेळवून पाहू शकते. डावखुरा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाची वर्णीही लागू शकते आणि आवेश त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची जागा घेऊ शकतो. यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा गेल्या वर्षी रायपूर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या चौथ्या सामन्यापासून टी-20 खेळत आला आहे आणि त्याला विश्रांती द्यायची असेल, तर संजू सॅमसनला आणण्याचा पर्याय आहे.
अफगाणिस्तानने या मालिकेत चमक दाखविलेली असली, तरी त्याचे रुपांतर विजयात ते करू शकलेले नाहीत. दोन साधारण खेळीनंतर सलामीवीर रेहमानउल्ला गुरबाजकडून त्यांना चांगल्या प्रयत्नांची अपेक्षा असेल. चिन्नास्वामी स्टेडियमवरील खेळपट्टीचे स्वरुप आणि कमी अंतरावर असलेल्या सीमारेषा त्याला चांगल्या प्रमाणात धावा जमविण्याची संधी देऊ शकतात. अफगाणिस्तान यापुढे श्रीलंका आणि आयर्लंडविऊद्ध खेळणार आहे. त्यापूर्वी भारताविऊद्ध आजच्या सामन्यात विजय मिळविता आल्यास तो अफगाणिस्तानचा आत्मविश्वास नक्कीच वाढवून जाईल.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : इब्राहिम झद्रन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रेहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलाबदिन नायब, रशिद खान.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.