सौरऊर्जा निर्मितीत भारत तिसऱ्या स्थानी
20 लाख घरांना मोफत विजेची सुविधा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अक्षयऊर्जा क्षेत्रात भारताने एक मोठा टप्पा गाठला आहे. देशाची सौरऊर्जा निर्मिती क्षमता आता 125 गिगावॅट इतकी ओलांडली आहे. यामुळे भारत जगातील सौरऊर्जेचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या 8 व्या सभेपूर्वी आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. ही सभा 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे.
2030 पर्यंत 11,000 गिगावॅट अक्षयउर्जेचे लक्ष्य
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सीओपी 28 च्या उद्दिष्टांनुसार, ‘जगाला 2030 पर्यंत त्यांची अक्षयऊर्जा क्षमता तिप्पट करून 11,000 गिगावॅट करावी लागेल. यामध्ये सौरउर्जेची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. ते म्हणाले, आज, भारत सुमारे 125 गिगावॅट सौर क्षमतेसह जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षा स्थानिक पातळीवर खरा बदल कसा आणू शकतात याचा हा पुरावा आहे.’
भारत आणि फ्रान्सचा संयुक्त उपक्रम
आयएसए हा भारत आणि फ्रान्सचा संयुक्त उपक्रम आहे, ज्याचा उद्देश सौर उर्जेला प्रोत्साहन देऊन हवामान बदलाचा सामना करणे आहे. प्रल्हाद जोशी म्हणाले आतापर्यंत 124 देश आयएसएचे सदस्य झाले आहेत. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार, आयएसए एका रोपट्यापासून एका महाकाय वृक्षात वाढला आहे, जो ‘एका सूर्याखाली’ सर्वांना आश्रय आणि आशा प्रदान करतो.’
20 लाखांहून अधिक कुटुंबांना मोफत वीज
सरकारच्या ‘पीएम सूर्य घर-मुफ्त बिजली योजने’ अंतर्गत, आतापर्यंत 20 लाखांहून अधिक कुटुंबांना त्यांच्या घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून मोफत विजेचा लाभ मिळत आहे. 2030 पर्यंत सौरऊर्जेमध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आयएसएचे उद्दिष्ट आहे. यासोबतच, त्यांना सौर तंत्रज्ञान स्वस्त आणि वित्तपुरवठा सुलभ करायचा आहे, जेणेकरून अधिकाधिक देश सौरउर्जेचा अवलंब करू शकतील.