रशियन इंधन खरेदीत भारत तिसऱ्या स्थानी
डिसेंबर 2025 मधील स्थिती : तेलाची आयात 29 टक्क्यांनी कमी
नवी दिल्ली : अमेरिकेच्या निर्बंधांनंतर रशियाकडून कच्च्या तेलाची आयात 29 टक्क्यांनी कमी झाली, रिलायन्स आणि सरकारी मालकीच्या रिफायनर्सनी खरेदी कमी केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये रशियाकडून जीवाश्म इंधन खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आला. तुर्की भारताच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. ही माहिती युरोपियन संशोधन संस्था सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरने दिली आहे. सेरानुसार, डिसेंबरमध्ये रशियाकडून भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत महिन्याच्या आधारावर पाहता 29 टक्क्यांनी घट झाली.
रशियाकडून तेलावर प्रति बॅरल 60 डॉलर्सची किंमत
अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले आहेत. या दोन्ही कंपन्या रशियाकडून भारतात येणाऱ्या सुमारे 60 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा करत होत्या. या निर्बंधांनंतर, भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यांनी रशियाकडून तेल खरेदीत कपात केली. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने डिसेंबरमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत 49 टक्क्यांनी कपात केली.
त्याचवेळी, सरकारी तेल रिफायनरीजनी त्यांची आयात 15 टक्क्यांनी कमी केली, असे सेराने म्हटले आहे. अहवालानुसार, भारताने डिसेंबरमध्ये रशियाकडून एकूण 2.3 अब्ज युरो किमतीचे जीवाश्म इंधन खरेदी केले. यामध्ये कच्च्या तेलाचा वाटा 1.8 अब्ज युरो होता, तर कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादनांची आयात 424 दशलक्ष युरो होती. इतर पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी 82 दशलक्ष युरो होती. सध्या, रशियाच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीत चीनचा वाटा सर्वाधिक 47 टक्के आहे. भारताचा वाटा 38 टक्के आहे, तर तुर्की आणि युरोपियन युनियनचा प्रत्येकी 6 टक्के वाटा आहे.
तुर्की दुसरा मोठा खरेदीदार
डिसेंबरमध्ये, तुर्की रशियाकडून जीवाश्म इंधनाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला. त्याने एकूण 2.6 अब्ज युरो किमतीचे इंधन खरेदी केले. यामध्ये सर्वात मोठा वाटा तेल उत्पादनांचा होता, जो 44 टक्के किंवा 1.1 अब्ज युरो होता. यानंतर, पाइपलाइन गॅस आयात 989 दशलक्ष युरो इतकी झाली. डिसेंबरमध्ये रशियाकडून जीवाश्म इंधनाचा सर्वात मोठा खरेदीदार चीन राहिला आहे. चीनच्या खरेदीत कच्च्या तेलाचा वाटा 60 टक्के होता, ज्याची किंमत 3.6 अब्ज युरो होती.
डिसेंबरमध्ये रशियाचा दररोजचा जीवाश्म इंधन महसूल 2 टक्क्यांनी घसरून 500 दशलक्ष युरो प्रतिदिन झाला. कच्च्या तेलापासून मिळणारा महसूल 12 टक्क्यांनी घसरून 198 दशलक्ष युरो प्रतिदिन झाला. तथापि, एलएनजीपासून रशियाचा महसूल 13 टक्क्यांनी वाढला. डिसेंबरमध्ये फ्रान्स आणि स्पेनने रशियाकडून एलएनजी आयात वाढवली. फ्रान्सने 18 टक्क्यांनी आणि स्पेनने 27 टक्क्यांनी आयात वाढवली. सीआरईएच्या मते, रशियाची जीवाश्म इंधन निर्यात अजूनही काही देशांवर अवलंबून आहे.