नवीकरणीय ऊर्जेत भारत जागतिक चौथ्या स्थानावर
श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय सौर परिषदेची सांगता
नवी दिल्ली : आज नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि अलीकडेच भारताने 90 गिगावॅट पेक्षा अधिक स्थापित सौर ऊर्जेचा नवीन उच्चांक गाठला आहे, असे विधान केंद्रीय उर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या (आयएसए) सातव्या सर्वसाधारण सभेत स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी सौर ऊर्जा संबंधित नवीन तंत्रज्ञानावरील उच्च स्तरीय परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. मागील दशकात सौर ऊर्जेच्या क्षमतेत जवळपास 34 पटीने झालेली वाढ ही स्वच्छ ऊर्जेत संक्रमण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रमाण आहे. 2030 पर्यंत भारत 280 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने दमदारपणे वाटचाल करीत आहे, असे केंद्रीय वीज आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री नाईक पुढे म्हणाले.
ऊर्जेची साठवण आणि ग्रीडचे व्यवस्थापन करण्याच्या योग्य तंत्रज्ञानामुळे भारत 24 तास नवीकरणीय वीज पुरवठा करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आज सौर तंत्रज्ञान विविध पातळ्यांवर वापरले जात आहे. मोठ्या गिगावॅट-स्तरीय सौर पार्क ते कमी क्षमतेच्या किलोवॅट स्तराच्या निवासी सौर प्रणालीपर्यंत हे सौर तंत्रज्ञान वापरले जात आहे. अतिदुर्गम भागांत सौर दिव्यांद्वारे घरे उजळली जात आहेत. आता आम्ही कॅरोसिनच्या दिव्यांपासून मुक्त झालो आहोत, असे ते पुढे म्हणाले. क्षमता विस्तार आणि पंतप्रधान सूर्य घर मुफ्त वीज योजना, पीएम-कुसुम आणि नॅशनल ग्रीनहायड्रोजन मिशन यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली कमी कार्बन विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. 125 देशांचा सहभाग लाभलेल्या या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाले. या परिषदेत सध्याच्या तीव्र अशा जागतिक आव्हानांवर चर्चा झाली. या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाजगी क्षेत्र व संशोधन संस्थांमध्ये सहकार्यपूर्ण भागीदारीचे आवाहन नाईक यांनी यावेळी केले.