भूक निर्देशांकात भारत 105 व्या स्थानी
पाकिस्तान पिछाडीवर : नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशची स्थिती भारतापेक्षा सरस
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चालू वर्षातील जागतिक भूक निर्देशांक (ग्लोबल हंगर इंडेक्स) यादीत 127 देशांमध्ये भारत 105 व्या स्थानावर आहे. गेल्यावषी म्हणजे 2023 मध्ये भारताचे स्थान 125 देशांमध्ये 111 वे तर 2022 मध्ये 121 देशांमध्ये 107 वे होते. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा परिस्थिती सुधारली आहे. मात्र, भूक निर्देशांक गुणांक अजूनही 27.3 या पातळीवर असून तो गंभीर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची स्थिती भारतापेक्षा वाईट आहे. पण नेपाळ, बांगलादेश, कंबोडिया, फिजी, श्रीलंका हे देश आपल्या लोकांना भुकेपासून वाचवण्यात आपल्यापेक्षा सरस ठरल्याचे दिसत आहे.
जागतिक भूक निर्देशांक कोणत्याही देशात उपासमारीसंबंधी स्थितीची पातळी दर्शवितो. ही यादी दरवषी कन्सर्न वर्ल्डवाईड आणि वर्ल्ड हंगर हेल्प या युरोपीयन एनजीओमार्फत तयार केली जाते. जगभरातील विविध देशांमध्ये चार श्रेणींचे मूल्यांकन केल्यानंतर हा निर्देशांक तयार केला जातो. ग्लोबल हंगर इंडेक्स-2023 मध्ये भूक निर्देशांकात भारताचे स्थान घसरल्यानंतर केंद्र सरकारकडून त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षीही भारत साधारण त्याच पातळीवर राहिला आहे. मात्र, अद्याप सरकारच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.