‘ब्राह्मोस-2’ च्या तयारीत भारत
ब्राह्मोस-1 ने पाकिस्तानात घडविली मोठी हानी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानात प्रचंड नुकसान घडवून आणणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात घातक सुपरसोनिक क्षेपणास्त्रांपैकी एक ठरले आहे. शत्रूच्या गोटात भीषण विध्वंस घडविण्याच्या या वारशाला पुढे नेत भारत आता पुढील पिढीचे हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस-2’च्या विकासात वेग आणण्यासाठी तयार आहे. डीआरडीओकडून स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिन तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण प्रगती करण्यात आल्यावर ब्राह्मोस-2 च्या विकास प्रक्रियेला वेग मिळाला आहे.
अत्याधुनिक ब्राह्मोस-2 क्षेपणास्त्राचा वेग मॅक 8 (ध्वनिच्या वेगापेक्षा 8 पट अधिक) असेल. याची मारकक्षमता 1500 किलोमीटर राहिल अशाप्रकारे याला डिझाइन करण्यात येत आहे. वर्तमान ब्राह्मोसचा कमाल वेग 3.5 मॅक आहे. याची मारकक्षमता 290-800 किलोमीटरपर्यंत आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र सध्या जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ब्राह्मोस-2 हायपरसोनिक क्षेपणास्त्र असेल. सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचा वेग 1-5 मॅकपर्यंत असतो. तर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वेग 5-12 मॅकपर्यंत असतो. ब्राह्मोस-2च्या संयुक्त विकासावर भारत आणि रशियादरम्यान उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरू होणार आहे. या हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचे लक्ष्य मॅक 6 हून अधिक वेगप्राप्त करणे आहे आणि हे रशियाच्या 3एम22 जिरकोन क्षेपणास्त्राने प्रेरित असेल, जे एक स्क्रॅमजेट-संचालित हायपरसोनिक क्षेपणास्त्र अन् आण्विकशक्तीने युक्त क्षेपणास्त्र आहे.
ब्राह्मो-2 प्रकल्पाची संकल्पना सुमारे एक दशकापूर्वी ब्राह्मोस एअरोस्पेसकडून मांडण्यात आली होती. या संकल्पनेला पूर्वी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते. या अडथळ्यांमध्ये रशियाकडून प्रगत हायपरसोनिक तंत्रज्ञान भारताला पुरविण्याची अनिच्छा आणि अधिक खर्च यासारख्या चिंता सामील होत्या. ब्राह्मोस-2 प्रकल्पाची घोषणा सर्वप्रथम 2008 मध्ये करण्यात आली होती आणि याचे परीक्षण 2015 पर्यंत होईल अशी अपेक्षा होती. परंतु अनेक कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला. ज्यात मिसाइल कंट्रोल टेक्नॉलॉजी रिजीम (एमटीसीआर)चा सदस्य म्हणून रशिया प्रारंभी 300 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याचे तंत्रज्ञान पुरवू शकत नव्हता. 2014 मध्ये भारत एमटीसीआरचा सदस्य झाल्यावर ही स्थिती बदलली. परंतु जगात अत्याधुनिक हायपरसोनिक शस्त्रास्त्रांबद्दल वाढती रुचि आणि प्रतिस्पर्धेमुळे या प्रकल्पाबद्दल पुन्हा रुचि निर्माण झाली. ज्यामुळे दोन्ही देश (भारत-रशिया) स्वत:च्या सामरिक रक्षणाला मजबूत करण्यासाठी सहकार्य वाढविण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत.
देशाकडे सध्या जे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे, ते भारत आणि रशियादरम्यान संयुक्त उपक्रम ब्राह्मोस एअरोस्पेस (1998 मध्ये स्थापन)चा परिणाम आहे. याला जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र मानले जाते. वर्तमान ब्राह्मोस क्षेपणास्त्र मॅक 3.5 चा वेग गाठण्यास सक्षम असून 290-800 किलोमीटरपर्यंतचे अंतर गाठू शकते. हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्य, नौदल आणि वायुदलाच्या ताफ्यात सामील असून ते जमीन, पाणी, आकाश आणि पाणबुडीतून डागता येईल अशा दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आले आहे. फायर अँड फॉरगेट या तंत्रज्ञानामुळे हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण रणनीतिच्या सर्वात महत्त्वपूर्ण शस्त्रास्त्रांपैकी एक ठले आहे. या क्षेपणास्त्राचा वापर ऑपरेशन सिंदूरदरम्यान करण्यात आला होता.
पाकिस्तानला ब्राह्मोसची धास्ती
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीरपणे ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या वायुतळांचे नुकसान घडविल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची रणनीति आखत असताना भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानच्या अनेक वायुतळांना लक्ष्य केल्याचे शाहबाज शरीफ यांनी अझरबैजान येथे सांगितले होते.
ब्राह्मोस-2 ची फायर पॉवर
- ब्राह्मोस-2चा वेग 6-8 मॅकदरम्यान असेल. म्हणजेच 8600-10000 किलोमीटर/प्रतितास. हे क्षेपणास्त्र 1500 किमीपर्यंतचा पल्ला गाठू शकणार.
- हे क्षेपणास्त्र हायपरसोनिक वेगाने सातत्याने उ•ाण करणार आणि लक्ष्याला नष्ट करणार आहे.
- याचे डिझाइन रशियाच्या 3एम22 जिरकोनने प्रेरित असेल, जे मॅक 9चा वेग गाठू शकते आणि रशियाच्या नौदलात सामील झाले आहे.
- ब्राह्मोस-2मध्ये स्क्रॅमजेट इंजिन असेल, जे वर्तमान ब्राह्मोस रॅमजेट प्रणालीपेक्षा खुपच अधिक प्रगत असणार आहे.
- ब्राह्मोस-2 चे वजन जवळपास 1.33 टन असण्याची शक्यता आहे, हे आकाशातून प्रक्षेपित होणाऱ्या ब्राह्मोस-2 पेक्षा जवळपास निम्मे असेल.
- भारताचे स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क 2 सह अनेक लढाऊ विमानांमध्ये हे क्षेपणास्त्र जोडता येणार.