For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेश - लिरेन लढत आयोजित करण्यासाठी भारताची तयारी

06:53 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेश   लिरेन लढत आयोजित करण्यासाठी भारताची तयारी
Advertisement

पण बोली लावण्याआधी सर्व पर्याय पडताळून पाहणार : बुद्धिबळ महासंघ

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारताचा डी. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यात फिडे विश्व विजेतेपदासाठी लढत होणार असून या सामन्याचे आयोजन करण्याच्या दृष्टीने बोली लावण्याआधी सर्व पर्याय अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) पडताळून पाहत आहे.

Advertisement

‘आम्ही बोली लावण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट अंतर्गत पडताळून पाहत आहोत. लॉजिस्टिक, जाहिराती आणि इतर सर्व काही बाबी आम्ही समजून घेत आहोत. एकदा का आम्हाला सखोल समज आणि स्पष्टता आली की, आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ शकू, असे एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी सांगितले आहे. नारंग पुढे म्हणाले की, बोली लावायची की नाही याबाबत चित्र स्पष्ट झाल्यानंतरच यजमान शहराबाबत निर्णय घेतला जाईल.

शनिवारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने जागतिक विजेतेपदाच्या लढतीसाठी बोलीदारांना आमंत्रित केले आहे. 8.5 दशलक्ष डॉलर्सचे (अंदाजे ऊ. 71 कोटी) बजेट आणि 1.1 दशलक्ष डॉलर्सचे (अंदाजे ऊ. 9 कोटी) सुविधा शुल्क असे निकष यासाठी घालून दिलेले आहेत. ‘एआयसीएफ’ला 31 मे पर्यंत बोली सादर करायची आहे, तर ‘फिडे’ 1 जुलै रोजी या प्रतिष्ठेच्या लढतीचे यजमनापद बहाल करेल. ‘फिडे’ने ठरविलेली एकूण बक्षीस रक्कम 2 दशलक्ष डॉलर्सवरून (ऊ. 17 कोटी) वाढवून गेल्या वर्षी सुमारे 2.5 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 21 कोटी ऊपये) करण्यात आलेली आहे.

विश्व विजेतेपदासाठीची लढत 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे. 17 वर्षीय गुकेश गेल्या आठवड्यात टोरंटो येथे झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद मिळविल्यानंतर या लढतीसाठी पात्र ठरला आहे. रशियाचा महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हचा 40 वर्षे जुना विक्रम मोडून तो कँडिडेट्स स्पर्धा जिंकणारा आणि विश्व विजेतेपदाच्या लढतीकरिता पात्र ठरणारा सर्वांत तरुण खेळाडू बनला आहे.

Advertisement
Tags :

.