For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत कसोटी मालिका जिंकण्यास सज्ज

06:58 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत कसोटी मालिका जिंकण्यास सज्ज
Advertisement

आजपासून श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीस प्रारंभ, कुलदीप यादवला वगळले जाण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था, कोलंबो : येथे आज रविवारी सुरू होणाऱ्या श्रीलंकेविऊद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे. गेल्या तीन वर्षांत परदेशात कसोटी मालिका प्रथमच जिंकण्याच्या भारताच्या प्रयत्नात या दोघांच्या कामगिरीची महत्त्वाची भूमिका असेल.

भारताचा परदेशातील शेवटचा कसोटी मालिका विजय जुलै, 2023 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध झाला होता. त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविऊद्धच्या मालिका अनिर्णित राहिल्या. या काळात मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध झालेल्या पराभवांमुळे भारतीय कसोटी संघाच्या यशाच्या झगमगाटाला काहीसा धक्का बसला होता. मात्र गाले येथील पहिल्या कसोटीत 165 धावांनी दणदणीत विजय मिळवून गिलच्या संघाने आपली स्थिती सुधारली. या सामन्यात श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी पाहुण्या फलंदाजांना अनेकदा अडचणीत आणले होते.

Advertisement

श्रीलंकेच्या संघात अनुभवाची कमतरता असली, तरी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध मायदेशात झालेल्या दोन निराशाजनक पराभवांनंतर मिळालेला हा विजय भारतीय संघ आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी नक्कीच दिलासादायक ठरला आहे. गालमधील विजयामुळे संघावरील दडपण नक्कीच कमी झाले आहे. जर भारताने 2-0 असा ‘क्लीन स्वीप’ केला, तर त्यांना 57.58 टक्के गुणांसह जागतिक कसोटी स्पधेंच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेण्याची संधी मिळेल. बांगलादेश सध्या डार्विनमधील विजयानंतर 66.67 टक्के गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मात्र मॅके येथे ऑस्ट्रेलियाविऊद्धची दुसरी कसोटी ते हरण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ते 55.56 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर घसरू शकतात.

पहिल्या कसोटीतील विजयामुळे आनंदाचे वातावरण असले, तरी गिल आणि जैस्वाल यांच्याकडून धावांची अपेक्षा नक्कीच केली जाईल. वरकरणी पाहता गिल चांगल्या लयीत दिसत आहे. त्याने गेल्या सहा डावांत दोन शतके झळकावली आहेत. परंतु बारकाईने पाहिल्यास, त्याच्या खेळात काही कमकुवत दुवे दिसून येतात. विशेषत: फिरकी गोलंदाजीसमोर आणि त्यातही डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांविऊद्ध बाद होण्याचा एक विशिष्ट नमुना दिसून येतो. याच कमकुवतपणामुळे गालमध्ये तो दोनदा प्रभात जयसूर्याचा बळी ठरला.

कर्णधार म्हणून आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू असताना लागलेला हा डाग पुसून टाकण्यासाठी तो नक्कीच प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली परदेशातील पहिली कसोटी मालिका जिंकण्याची बाबही महत्त्वाची आहे. जैस्वालच्या बाबतीत मात्र परिस्थिती थोडी अधिक गुंतागुंतीची आहे. गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे वेस्ट इंडिजविऊद्ध शतक झळकावल्यानंतर या सलामीवीराने आपल्या मागील आठ डावांमध्ये केवळ एक अर्धशतक केले आहे. फिरकी गोलंदाजांविऊद्ध गिलला येणाऱ्या अडचणींप्रमाणेच जैस्वाललाही वेगवान गोलंदाजांविऊद्ध ‘कट’ किंवा ‘चिप’ फटका खेळताना बाद होण्याची चिंताजनक सवय जडली आहे.

गाल येथील पहिल्या डावात धावबाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात तो अशाच प्रकारे बाद झाला. या डावखुऱ्या फलंदाजाने असिथा फर्नांडोचा आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची हलकी कड घेऊन यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाच्या हातात विसावला. त्यामुळेच शुक्रवारी एसएससी मैदानावर आपल्या खेळातील ही त्रुटी सुधारण्यासाठी जैस्वालने सराव सत्रात बराच वेळ घालवला. भारताचे वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी ‘ऑफ स्टंप’च्या बाहेरच्या टप्प्यावर गोलंदाजी करत जैस्वालला ’कट’ किंवा ’पॉइंट’च्या दिशेने ’चिप’ फटका खेळण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र 24 वर्षीय जैस्वालने या आव्हानाचा समर्थपणे सामना केला आणि चेंडूंना यष्ट्यांपासून दूर सुरक्षितपणे जाऊ दिले.

आता जर जैस्वाल हा संयम प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणातही कायम राखू शकला, तर तो आणखी एक मोठी धावसंख्या उभारू शकेल. दरम्यान, गाल कसोटीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला कुलदीप यादव हा तिसरा खेळाडू आहे. त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. खेळपट्टीकडून चांगली मदत मिळूनही त्याला दोन डावांत मिळून 25 षटकांत केवळ एकच बळी घेता आला. पहिल्या कसोटीत गोलंदाजांमध्ये कुलदीप सर्वात महागडा ठरला आणि त्याने प्रति षटक चारहून अधिक धावा दिल्या. श्रीलंकेच्या संघात अनेक डावखुरे फलंदाज असल्याने डावखुऱ्या कुलदीपच्या जागी ऑफ स्पिनर सारांश जैनला संघात घेण्याचा विचार होऊ शकतो. शुक्रवारी सराव सत्रात कुलदीपची राहिलेली अनुपस्थिती पाहता त्याला कदाचित अंतिम अकरा खेळाडूंच्या संघातून वगळले जाऊ शकते.

श्रीलंकेच्या दृष्टीने विचार करता केवळ अनेक फटके मारून बाद होण्यापेक्षा मैदानावर टिकून राहण्यासाठी त्यांच्या फलंदाजांनी अधिक संयम आणि समंजसपणा दाखवण्याची गरज आहे. चांगल्या लयीत असलेल्या कामिल मिशारा आणि सहन अराचिगे यांचा संघात समावेश झाल्यामुळे सकारात्मक बदल घडेल अशी त्यांना आशा असेल.

संघ: भारत-शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सर्फराज खान.

श्रीलंका : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, कामिल मिशारा, पासिंदू सूरियाबंदरा, कामिंदू मेंडिस, सहन अराचिगे, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायका, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो.

सामन्याची वेळ : सकाळी 10 वा.

Advertisement
Tags :

.