India-Pakistan : भारत-पाक संघर्ष शमविण्यात इतर देशांची भूमिका?
भारत बदल्याची कारवाई करणार, हे देखील जगाला अपेक्षित होते
By : सुखदेव उंदरे
कोल्हापूर : शस्त्रसंघर्षाच्या चवथ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर अमेरिकन विदेश मंत्री मार्को रूबियो, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ट्विट करून तसेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री एका निवेदनाद्वारे युद्धविराम झाल्याची पुष्टी केली. परंतु शस्त्रसंधी होऊन तीन तासही उलटली नाहीत तोवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या घटना समोर आल्या.
भारतानेही 13 मे पर्यंत आपल्या सेनेला सतर्क राहण्याचे आणि चोख उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा जगातील सर्वच देशांनी निषेध केला होता. भारत बदल्याची कारवाई करणार, हे देखील जगाला अपेक्षित होते. त्याप्रमाणे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सीमा पार करीत या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. परंतु पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाच्या मुढतेने युद्धाला तोंड फोडले.
भारताची कूटनीतिक आणि लष्करी आघाडी2016 चा उरी आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कूटनीतिक पावले उचलली होती. त्यांची व्याप्ती मात्र मर्यादित ठेवली होती. त्यावेळी पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हरर्ड नेशन’चा दर्जा रद्द करून भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली होती.
पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तान विरुद्ध कूटनीतिक आघाडी उघडली. भारताने मुख्य सीमा बंद केल्या. नागरिकांची ये-जा बंद केली. सिंधू जल करार स्थगित केला. राजनयिक अधिकारी आणि नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली. अतिशय नृशंस अशा पहलगाम हल्यानंतर भारत केवळ कूटनीतिक कार्यवाही करून थांबणे शक्य नव्हते. त्यामळे लष्करी आघाडी उघडून भारताने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला चढवला.
‘ऑपरेशन सिंदूर’चा जगाला संदेश‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दिलेला संदेश केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर जगासाठीही महत्त्वाचा आहे. भारत आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, हे तर या कारवाईतून स्पष्ट झालेच आहे, पण या निमित्ताने जागतिक राजकारण, संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षाविषयक धोरणात भारताने केलेला आक्रमक बदल देखील अधोरेखित झाला आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिकाभारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर संयुक्त राष्ट्रासह जगातील सर्वच राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला दिला. ह्या युद्धजन्य परिस्थितीत केवळ दोनच असे देश होते की, त्यांनी उघडपणे युद्धाच्या बाजूने आपली भूमिका घेतली. ते देश म्हणजे टर्की आणि इस्रायल. टर्की या अर्दोआन यांनी पाकिस्तानची, तर इस्रायलने भारताची बाजू घेतली. परंतु संयुक्त राष्ट्रासह उर्वरित सर्व जग मात्र भारत-पाक युद्ध होऊ नये या मताचेच होते.
अमेरिका, रशिया, चीन या प्रमुख देशांनी देखील युद्धाच्याऐवजी दोन्ही देशांनी कूटनीतिक मार्गानेच तणाव कमी करावा यावर भर दिला.ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा अर्थट्रम्प यांच्या भूमिकेबाबत भारताने सावध राहण्याची गरज आहे. 10 तारखेला शनिवारी संध्याकाळी ‘ट्रुथ’ या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षविरामासाठी सहमत झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर रविवारी सकाळी ट्रम्प महोदयांचे पुन्हा एक ट्विट आले.
ज्यामध्ये युद्धविराम झाल्याबद्दल आपल्याला अपार आनंद असल्याचे सांगून ते काश्मीरच्या मुद्याला हात घालतात. भारत-पाकिस्तानबरोबर मिळून गेल्या हजार पासून सुरू असलेल्या ऐतिहासिक काश्मीर विवादाचे समाधान शोधण्याची वेळ आली असल्याची वल्गना ते करतात. याचा अर्थ भारत-पाक मधील संघर्ष अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने शमला असा होतो.
परंतु भारत सरकारने मात्र अधिकृतरित्या शस्त्रसंधीसाठी अजून तरी ट्रम्प महोदयांचे आभार मानले नाहीत. याचा अर्थ द्विपक्षीय संबंधात बाह्य हस्तक्षेप किंवा मध्यस्थता नको ही भारताची आजपर्यंत भूमिका कायम आहे.शेवटी, पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालून दहशतवादी पोसणारा देश आहे.
अशा आत्मघाताच्या बुरुजावर उभा असणारा पाकिस्तान सीझफायरचे पालन कसे? किती? आणि कुठवर करतो हा खरा प्रश्न आहे. भारताने मात्र आपण दहशतवादाविरोधात कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे जगाला स्पष्ट संदेश दिला आहे.
बॅक डोअर डिप्लोमसी
युद्धजन्य परिस्थितीत सौदी अरेबियाचे उप परराष्ट्रमंत्री भारतात, तर परराष्ट्रमंत्री पाकिस्तानमध्ये असणे हा काही योगायोग म्हणता येणार नाही. सौदी अरेबिया हा दोन्ही देशांचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश आहे. भारत-पाकिस्तान युद्धाने केवळ आशियाई क्षेत्रच नव्हे, तर अमेरिकेसह संपूर्ण जगावरच त्याचे दुष्परिणाम संभवणार होते.
अमेरिकेचे दोन्ही देशांच्या टॉप लीडरशिप बरोबर सातत्याने बोलणे चालू होते, ज्याचा परिणाम शेवटी संघर्षविराम होण्यामध्ये झाला असे ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटरवरून दिसते आहे.