भारत-पाकिस्तानकडून कैद्यांच्या यादीचे आदान-प्रदान
विदेश मंत्रालयाने दिली माहिती : 382 पाकिस्तानी भारतातील तुरुंगात कैद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्ताननने मंगळवारी परस्परांच्या तुरुंगात कैद नागरिक अन् मच्छिमारांच्या यादीचे आदान-प्रदान केले. नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये हे आदान-प्रदान राजनयिक माध्यमांद्वारे एकाचवेळी करण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे.
ही प्रक्रिया 2008 च्या द्विपक्षीय कौन्स्युलर अॅक्सेस कराराच्या अंतर्गत होते. या करारानुसार दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी अशाप्रकारच्या याद्यांचे आदान-प्रदान केले जाते. भारताने तुरुंगा असलेल्या 382 पाकिस्तानी नागरिक कैद्यांची अन् 81 मच्छिमारांच्या नावांची यादी दिली आहे. तर पाकिस्तानने 53 भारतीय नागरिक कैदी आणि 193 मच्छिमारांच्या नावांची यादी दिली आहे.
कैदेतील भारतीय नागरिक, मच्छिमार आणि पकडण्यात आलेल्या नौका लवकर मुक्त करण्याचा आग्रह भारत सरकारने पाकिस्तानला केला आहे. तसेच 159 भारतीय मच्छिमार आणि नागरिक कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली असल्याने त्यांची तत्काळ मुक्तता करण्यात यावी असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. याचबरोबर पाकिस्तानच्या ताब्यात असलेले 26 भारतीय कैदी आणि मच्छिमारांना अद्याप कौन्स्युलर अॅक्सेस मिळालेला नाही, भारताने त्यांच्यासाठी देखील त्वरित संपर्काची अनुमती मागितली आहे. या कैद्यांच्या मुक्ततेपर्यंत पाकिस्तानने त्यांची सुरक्षा अन् कल्याण सुनिश्चित करावे असे भारताने म्हटले आहे. मानवीय प्रकरणांना प्राथमिकतेसह निकाली काढण्यासाठी भारत प्रतिबद्ध असून यात परस्परांच्या तुरुंगातील कैदी आणि मच्छिमारही सामील आहेत. पाकिस्तानी मानलेल्या 80 लोकांची वापसी पाकिस्तानने पुष्टी न दिल्याने रखडली आहे. या 80 लोकांच्या नागरिकत्वाची पुष्टी लवकर करण्याचे आवाहन भारताने पाकिस्तानला केले आहे.
भारत सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे 2014 पासून आतापर्यंत पाकिस्तानातून 2,661 भारतीय मच्छिमार आणि 71 भारतीय नागरिकांना परत आणण्यास यश मिळाल्याचे वक्तव्य विदेश मंत्रालयाने पेले आहे.