भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
आशियाई सांघिक टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत पदक शर्यतीतून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला टेबल टेनिसपटूंची कामगिरी निराशाजनक झाली. पुरूष गटात उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला संघाला सिंगापूरने उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले.
भारत आणि सिंगापूर यांच्यात महिला विभागातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मनिका बात्रा, दीया चितळे यांना चांगली कामगिरी करता आली नाही. मनिका बात्रा अलिकडच्या कालावधीत सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. या लढतीमध्ये दीया चितळेने 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण तिला ती राखता आली नाही. तसेच यशस्वीनी घोरपडेने सिंगापूरच्या खेळाडूंवर विजय मिळविला. पण सिंगापूरने अखेर ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान महिलांच्या विभागात टॉपसिडेड चीनने थायलंडचा तासभराच्या लढतीत 3-0 असा फडशा पाडत पुढील फेरी गाठली आहे. पुरूषांच्या विभागात चीनने इराणचा 3-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले तसेच चीन तैपेईने द.कोरियावर 3-2 अशी मात केली.