इंडिया ओपन : अॅक्सेलसेन, अॅन से-यंग यांना जेतेपदे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिंपिक विजेता व्हिक्टर अॅक्सेलसेन आणि अॅन से-यंग यांनी रविवारी येथे झालेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत एकतर्फी विजय मिळवत अनुक्रमे पुऊष आणि महिला एकेरीचे मुकुट पटकावले.
2017 आणि 2019 च्या विजेत्या अॅक्सेलसेनने के. डी. जाधव इनडोअर हॉलमध्ये झालेल्या पुऊष एकेरीच्या अंतिम सामन्यात गेल्या वर्षी अंतिम फेरी गाठलेल्या हाँगकाँगच्या ली चेउक यिउवर 21-16, 21-8 असा विजय मिळवला. दोन्ही अंतिम फेरीत कोणताही भारतीय खेळाडू नसतानाही सदर हॉल जवळजवळ भरलेला होता. अशा प्रकारे दोन वेळच्या विश्वविजेत्या अॅक्सेलसेनने गेल्या आठवड्यात मलेशियन ओपन सुपर 1000 च्या पहिल्या फेरीत याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची निराशा पुसून टाकली. मागील 10 वर्षांतील इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत खेळण्याची अॅक्सेलसनची ही सहावी खेप होती.
महिला एकेरीत 2023 ची विजेती कोरियाची अॅन से-यंग हिने आणखी एक सुंदर कामगिरी केली. तिने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगला 21-12, 21-9 असे सहज पराभूत करून तिचा दुसरा इंडिया ओपन किताब जिंकला. गेल्या वर्षीही तिने अंतिम फेरी गाठली होती. दुसरीकडे, गोह से फेई आणि नूर इझ्झुद्दिंग या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विकसाईराज रान्कीरेड्डी आणि चिराग शेट्टीचे आव्हान संपविणाऱ्या मलेशियन जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत किम वोन हो आणि सेओ सेउंग जे या कोरियन जोडीला 21-15, 13-21, 21-16 असे हरवून आणखी एक उत्कृष्ट कामगिरी नोंदविली.
महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या अरिसा इगाराशी आणि अयाको साकुरामोतो यांनी दक्षिण कोरियाच्या किम हे जांग आणि काँग ही यंग यांचा 21-15, 21-13 असा पराभव केला. जपानी जोडीसाठी त्यांची ही फक्त तिसरी स्पर्धा होती. इगाराशी, जिला पूर्वी अन्सा हिगाशिनो म्हणून ओळखले जात असे, तिने मिश्र दुहेरीतून महिला दुहेरीत उडी घेतली आहे. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या जियांग झेन बँग आणि वेई या झिन यांनी थॉम गिक्वेल आणि डेल्फीन डेलरू या फ्रेंच जोडीवर 21-18, 21-17 असा विजय मिळवला.