Narendra Modi | मध्य-पूर्वेतील युद्धामुळे भारत 'सुपर अलर्ट'वर; पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी सरकार सक्रिय
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थान, ७ लोक कल्याण मार्ग येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला वरिष्ठ सरकारी मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पेट्रोलियम, कच्चे तेल, वायू वीज आणि खत क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तेल, वायू आणि खते यांसारख्या सर्व अत्यावश्यक वस्तूंचा देशाला अखंड पुरवठा सुनिश्चित करणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानेतृत्त्वात रविवारी महत्वाची बैठक घेण्यात आली. या स्थितीवरून भारत सरकार पूर्ण 'सुपर अलर्ट'वर गेल्याचे दिसत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रसायन आणि खते व आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी, कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया आणि इतर वरिष्ठ मंत्री व अधिकारी उपस्थित होते.
मध्यपूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर, तेल, वायू आणि खतांचा अखंड पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकार आधीच सक्रिय पावले उचलत आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संघर्षाच्या काळात मारतही अनेक आव्हानांचा सामना करत आहे. या आव्हानाचा सामना शांतता, संयम आणि जनजागृतीने केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारातील किमती नियंत्रित करण्यासाठी सरकार अधिक कठोर निर्णय घेऊ शकते.