भारत न्यूझीलंडशी बरोबरी साधण्याच्या मोहिमेवर
पुणे येथे आजपासून दुसरा कसोटी सामना, खेळपट्टी फिरकीस पोषक राहण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/ पुणे
घरच्या मैदानावरील अनपेक्षित पराभवामुळे हादरलेला आणि स्टार खेळाडूंचा भरणा असलेला भारत आज गुरूवारपासून येथे सुरू होणाऱ्या महत्त्वाच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर प्रतिआक्रमण करण्याच्या दृष्टीने समतोल राखण्याचा प्रयत्न करेल. बेंगळूर येथे पहिल्या डावात 46 धावाच काढता आल्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा निर्णायक प्रदर्शन न्यूझीलंडला आठ गडी राखून विजयी होण्यापासून रोखू शकले नाही. यामुळे जागतिक कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल क्रमांक गमवावा लागलेला नसला, गुण कमी झाले आहेत.
पुढील महिन्यात पाच कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी पुढील दोन कसोटी जिंकणे हे रोहित शर्मा आणि त्याच्या खेळाडूंचे पहिले प्राधान्य असेल. भारत अडचणीत असल्याने येथील एमसीए स्टेडियममधील खेळपट्टीच्या स्वरूपावर निर्विवादपणे लक्ष केंद्रीत केले गेले आहे. काळ्या मातीच्या या खेळपट्टीवर गवताचे आच्छादन नसून न्यूझीलंडने बेंगळूरमध्ये जसा चेंडूच्या उसळीचा फायदा घेतला तसा तो येथे घेता येऊ नये यासाठी हे पाऊल उचलले आहे.
विल्यम ओ’ऊर्के आणि मॅट हेन्री व टिम साऊदी या अनुभवी जोडीसमोर भारताचे प्रतिभावान फलंदाज ढेपाळले होते आणि ढगाळ वातावरण असूनही रोहितला वेगवान गोलंदाजीस पोषक खेळपट्टीवर ताटात काय वाढून ठेवलेले असून शकते याचा अंदाज बांधता आला नव्हता. फिरकीस पोषक खेळपट्टी तयार करणे हा यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग ठरू शकतो. परंतु यापूर्वी दोनदा भारतावर ते पाऊल उलटलेले आहे. ऑस्ट्रेलियाने आठ वर्षांपूर्वी येथे त्यांना 333 धावांनी नमवले होते, तर गेल्या वर्षी इंदूरमध्ये त्याच संघाने त्यांना 9 गडी राखून पराभूत केले होते.
शुभमन गिल पुनरागमनासाठी प्रयत्नशील असल्याने के. एल. राहुल आणि सर्फराज खान यांच्यापैकी एकाला वगळावे लागेल. सर्फराजने बेंगळूरमध्ये दुसऱ्या डावात 150 धावा करून आपली बाजू भक्कम बनवली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन वरिष्ठ खेळाडूंकडून येथे मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. कोहलीने 2019-20 मध्ये येथे नाबाद 254 धावा काढून दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव करण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यापासून तो निश्चितच प्रेरणा घेऊ शकेल.
यशस्वी जैस्वालने बेंगळूर कसोटीत दुहेरी अपयशाचा सामना केला आणि या तऊण फलंदाजाने जाळ्यामध्ये सराव करताना त्याच्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. के. एल. राहुल सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसलेला नाही आणि त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा निघालेल्या नाहीत. कर्नाटकचा हा फलंदाज सध्या सर्फराजबरोबरच्या शर्यतीत अडकला आहे. रिषभ पंतने मंगळवारी भारताच्या सराव सत्राच्या समाप्तीच्या वेळी थोड्या काळासाठी यष्टीरक्षण केले. परंतु संपूर्ण सामन्याचा ताण सहन करण्याइतका तो 100 टक्के तंदुऊस्त आहे की नाही हे पाहावे लागेल.
भारताने खेळाडूंना भविष्यातील आव्हानांचा विचार करून पुरेशी विश्रांती दणे आवश्यक असले, तरी मालिका बरोबरीत आणणे सध्या खूप आवश्यक असल्याने जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता नाही. मात्र मोहम्मद सिराजला बळींच्या बाबतीत दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने आकाश दीप पुन्हा संघात येण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विन पुढील पाच दिवसांत रवींद्र जडेजासोबत खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. फिरकी टाकू शकणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरची भर देखील भारताच्या फलंदाजीला बळ देईल.
केन विल्यमसनची अनुपस्थिती असूनही न्यूझीलंडने चांगली कामगिरी केली आहे. रचिन रवींद्रची चमक दिसून आलेल्या मधल्या फळीत विल यंग दृढ दिसला आहे. तथापि, न्यूझीलंडला डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल या फलंदाजांकडून अधिक अपेक्षा असतील आणि त्याच वेळी इतरांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात साउदीने बजावलेल्या पराक्रमाचे अनुकरण करावे अशीही त्यांची इच्छा असेल.
पुण्याच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना बेंगळूरच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व गाजवत 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. बेंगळुरूच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळाली होती. पण आता दुसरा कसोटी सामना पुणे येथे होणार आहे. या मैदानावरील खेळपट्टीवर कोणाला मदत मिळणार? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंसाठी अनुकूल खेळपट्टी बनवली जाऊ शकते. प्रामुख्याने काळ्या मातीचा समावेश असलेल्या खेळपट्टीवर बेंगळूरमधील पहिल्या कसोटीपेक्षा कमी उसळी असेल. ही खेळपट्टी सपाट आणि संथ असेल. या कारणास्तव, तिथे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. यामुळे टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटूंचा समावेश करू शकते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आतापर्यंत दोन कसोटी सामने झाले आहेत. यापैकी टीम इंडियाने एक सामना जिंकला तर एक गमावला आहे. भारतीय संघाने 2017 मध्ये येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हा भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 333 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, भारताने 2019 मध्ये येथे दुसरा कसोटी सामना खेळला, जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 137 धावांनी पराभव केला होता.
पुण्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पहिल्या कसोटीत सातत्याने पावसाचा व्यत्यय आल्याचे पहायला मिळाले. आता, पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात हवामान खात्याने हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सामन्याचे पहिले तीन दिवस हवामान ढगाळ राहिल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर शेवटचे तीन दिवस हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संघ-भारत: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल, एजाज पटेल, मॅट हेन्री, टिम साउदी, विल्यम ओ’रुर्के, जेकब डफी.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.