For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारत-न्यूझीलंड वनडे मालिका आजपासून

06:58 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत न्यूझीलंड वनडे मालिका आजपासून
Advertisement

भारतासाठी कमकुवत वेगवान गोलंदाजी हा चिंतेचा विषय : रोहित शर्मा-विराट कोहलीवर लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था, ऑकलंड : दक्षिण गोलार्धातील आपल्या शेवटच्या दौऱ्यावर असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली अपेक्षेप्रमाणेच पुन्हा एकदा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहेत. कारण भारताची न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका आज बुधवारपासून सुरू होत आहे. परंतु कमी अनुभवी गोलंदाजीमुळे या मालिकेत न्यूझीलंडचे पारडे जड दिसत आहे.

जसप्रीत बुमराहला कसोटी सामन्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने आणि प्रसिद्ध कृष्णा व हर्षित राणा या दोघांचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन अजून काही आठवड्यांनी होणार असल्याने या मालिकेत मोहम्मद सिराजवर अतिरिक्त भार पडेल. इतर चार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (18), गुरनूर ब्रार (9), अंशुल कंबोज आणि अकिब नबी (प्रत्येकी 1) यांच्याकडे मिळून 29 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. टॉरंगा येथील पाचव्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर लगेचच जागतिक कसोटी स्पर्धेतील सामने होणार असल्याने भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी खेळणार नाही. ही मालिका 15 नोव्हेंबरला संपेल आणि पहिला कसोटी सामना 19 नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये सुरू होईल. कर्णधार शुभमन गिल सुद्धा कसोटींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शेवटचे दोन एकदिवसीय सामने खेळणार नाही.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलिया, भारतासाठी (सध्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर) परिस्थिती कठीण झाली आहे. कारण त्यांना उर्वरित सात कसोटी सामन्यांपैकी किमान सहा सामने जिंकावे लागतील आणि इतर काही सामन्यांचे निकालही आपल्याला हवे तसे लागतील अशी आशा बाळगावी लागेल. सध्या एकदिवसीय संघात भारताची पहिल्या पाच फलंदाजांची फळी जवळपास निश्चित झाली आहे, ज्यात रोहित आणि कर्णधार गिल डावाची सुऊवात करतील. त्यानंतर कोहली आणि मग उपकर्णधार श्रेयस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज के. एल. राहुल पाचव्या क्रमांकावर असेल, तर अष्टपैलू अक्षर पटेल व नितीशकुमार रे•ाr (फक्त पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी उपलब्ध) यांना सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर संधी दिली जाईल. हर्षित राणा अजूनही उपलब्ध नसल्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन आठव्या क्रमांकावर अंशुल कंबोजच्या फटकेबाजीचा वापर करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे. ईडन पार्कवर सीमारेषा केवळ 55 मीटर इतक्या कमी अंतरावर असून तिथे भारताला तीन वेगवान गोलंदाजांची गरज भासेल.

सध्याच्या संघातील 201 बळींसह एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कुलदीप यादव उपलब्ध असला, तरी हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे त्याला संघात स्थान मिळवणे खूप कठीण झाले आहे. तथापि, 11 ते 40 षटकांदरम्यान वर्तुळाबाहेर केवळ चार क्षेत्ररक्षकांना परवानगी राहत असल्याने मधली षटके दुप्पट महत्त्वाची झाली आहेत आणि कुलदीप एक आक्रमक पर्याय आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.

जर भारताकडे चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता असेल, तर न्यूझीलंडही त्यांच्या स्वत:च्या समस्यांना तोंड देत आहे. कारण त्यांच्या एकदिवसीय संघाचे सरासरी वय 34 ते 35 च्या दरम्यान आहे, याकडे कर्णधार मिचेल सँटनर याने लक्ष वेधले. किंबहुना त्याने असे संकेत दिले की, अनेक खेळाडू 2027 च्या विश्वचषकाकडे त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे सामने म्हणून पाहत आहेत.

संघ-भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, नितीशकुमार रे•ाr, अक्षर पटेल, अंशुल कंबोज, अकिब नबी, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, इशान किशन, कुलदीप यादव, नमन धीर.

न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), टॉम सेफर्ट, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम, विल यंग, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, मायकल ब्रेसवेल, जेकब डफी, काईल जेमिसन, मॅथ्यू फिशर, मॅट हेन्री, ब्लेअर टिकनर, नॅथन स्मिथ.

सामन्याची वेळ : सकाळी 7:30 वा. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

थेट प्रक्षेपण :

Advertisement
Tags :

.