For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत - न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून

06:58 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत   न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून
Advertisement

भारतीय संघ विजयाने सुरुवात करण्यास सज्ज, विराट कोहली-रोहित शर्मा ठरतील आकर्षणाचे केंद्रबिंदू

Advertisement

वृत्तसंस्था/ वडोदरा

आज रविवारपासून वडोदरा येथे सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान भारत नव्या स्वरूपातील न्यूझीलंडशी भिडणार असताना, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उत्कृष्ट फॉर्म भारताच्या एकदिवसीय क्रिकेटमधील वाटचालीला बळ देईल अशी अपेक्षा आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीवर असलेल्या टी-20 विश्वचषकावर सर्वांचे लक्ष केंद्रीत असले, तरी पुढील सात दिवसांत होणाऱ्या तिन्ही सामन्यांमध्ये कोहली आणि रोहितच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहतील.

Advertisement

 

या दोन्ही वरिष्ठ फलंदाजांना सरावाची कोणतीही कमतरता भासलेली नाही. ते विजय हजारे चषक स्पर्धेच्या लीग फेरीत काही सामने खेळले आहेत आणि मोठ्या धावसंख्या नोंदवून आपली उपयुक्तता त्यांनी अधोरेखित केली आहे.  तथापि, टी-20 विश्वचषक संघातून वगळल्यानंतर कर्णधार शुभमन गिलच्या प्रतिसादावर भारतीय संघ व्यवस्थापनाचे बारीक लक्ष असेल. गिलच्या अलीकडील फॉर्मवर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील बहुतेक सामन्यांत त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले.

 

दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या शेवटच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावले असले, तरी गिल एकदिवसीय संघात परतल्यामुळे त्याला वरच्या फळीतून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. मधल्या फळीला अयशस्वी ठरलेल्या प्रयोगांच्या टप्प्यानंतर श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. 31 वर्षीय अय्यर आपला पसंतीचा चौथा क्रमांक पुन्हा मिळवेल अशी अपेक्षा आहे. के. एल. राहुलची यष्टीरक्षक आणि खालच्या फळीतील फलंदाज म्हणून भूमिका कायम राहिल्यामुळे रिषभ पंतला संघाबाहेर राहावे लागण्याची शक्यता आहे आणि 50 षटकांच्या स्वरुपात पंत दुसरा पर्याय म्हणून कायम राहील.

शनिवारपर्यंत अय्यर, पंत आणि मोहम्मद सिराज भारताच्या कोटंबी येथील एकदिवसीय मालिकेच्या तयारीत अनुपस्थित होते, तर रवींद्र जडेजाने शुक्रवारी पूर्ण तीव्रतेने सराव केला, ज्यामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे संकेत मिळाले आहेत. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना टी-20 सामन्यांसाठी ताजेतवाने ठेवण्याकरिता एकदिवसीय मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर असेल.

संध्याकाळचा दव आणि देशभरातील खेळपट्ट्यांच्या साधारणपणे पाटा स्वरूपामुळे आक्रमक पवित्रा घेऊन बळी घेण्याऐवजी धावा रोखण्यावर ज्या परिस्थितीत अधिक भर दिला जातो अशा परिस्थितीत कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी वाटून घेतील. हा सामना कोटंबी येथील नवीन बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणारा पहिला पुऊष आंतरराष्ट्रीय सामना असेल. या मैदानावर यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महिलांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती.

न्यूझीलंडसाठी गेल्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवाला फारसे महत्त्व नाही, कारण ही सध्याची मालिका त्यांना नवीन आणि दुसऱ्या फळीतील खेळाडूंचे मूल्यांकन करण्याची संधी देते. खेळाडू कोणीही असोत, ब्लॅक कॅप्स त्याच सांघिक मंत्राचे पालन करतील अशी अपेक्षा आहे, जो त्यांच्या 2024-25 च्या भारत दौऱ्यात प्रभावी ठरला होता. तेव्हा त्यांनी यजमान संघाला कसोटी मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप दिला होता.

या दौऱ्यात न्यूझीलंड संघाचा मंत्र, विशेषत: अनेक प्रमुख खेळाडू अनुपलब्ध असताना आणि मालिका भारतीय परिस्थितीत खेळली जात असताना, खेळाडूंना बाह्य आव्हानांकडे लक्ष न देता आपल्या सध्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. दुखापतीमुळे मिचेल सँटनर एकदिवसीय सामन्यांसाठी अनुपलब्ध आहे, तर टॉम लॅथम आपल्या अपत्यप्राप्तीसाठी घरी परतला आहे. माजी कर्णधार केन विल्यमसन ‘दक्षिण आफ्रिका 20’ या टी-20 लीगमधील आपल्या वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहे.

दुसरीकडे, रचिन रवींद्र आणि वेगवान गोलंदाज जेकब डफी यांना विश्रांती देण्यात आली आहे आणि पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीतून परतलेला मॅट हेन्री विश्वचषकाचा विचार करून ‘टी-20’ मालिकेसाठी तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. सँटनरच्या अनुपस्थितीत मायकेल ब्रेसवेल संघाचे नेतृत्व करेल. सँटनर टी-20 मालिकेसाठी संघात परतणार आहे. अष्टपैलू काइल जेमिसन आणि 23 वर्षीय लेग स्पिनर आदित्य अशोक यांच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. सँटनरच्या जागी जेडेन लेनोक्सला संघात स्थान देण्यात आले आहे. अनेक नवीन आणि अननुभवी खेळाडू संघात असूनही न्यूझीलंडकडे डेव्हॉन कॉनवे, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, विल यंग आणि ग्लेन फिलिप्स यांच्या रूपाने फलंदाजीची लक्षणीय ताकद आहे.

संघ-भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

न्यूझीलंड : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, मिचेल हे, निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जॉश क्लार्कसन, झॅक फॉल्क्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, क्रिस्तियान क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स, मायकेल रे.

सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.

Advertisement
Tags :

.