भारताला विश्वगुरू होण्यासाठी सामाजिक सलोख्याची गरज
माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन
करवीर परिषद, गाडगे महाराज अध्यासनतर्फे साहित्य पुरस्कार वितरण
कोल्हापूर
फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार देशभर पोहचवण्यात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अलीकडे कोल्हापुरातही सामाजिक दंगली घडत आहेत. त्यामुळे करवीर नगरीतील सामाजिक चळवळीला धक्का पोहचतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतू भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर सामाजिक सलोख्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासनाच्या वतीने साहित्य पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. बेळगाव येथील रहिवासी स्वातंत्र सैनिक विठ्ठलराव याळ्ळगी यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ तर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. तसेच अनेक साहित्यकृतींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. मुळे म्हणाले, सामाजिक चळवळीचा पाया घट्ट असल्यास तार्किक उत्तर देता येतात. कारण मूल्य व्यवस्थेला तर्काची गरज असते. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी याळ्ळगी कुटुंबातील जवळपास 17 जण हुतात्मा झाले. स्वातंत्र सैनिकांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. परंतू सध्या देशसेवेच्या नावाखाली राजकारण करून देशातील शांतात भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू देशातील शेवटच्या माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा आणि प्राथमिक गरजा पोहचवल्या पाहिजेत. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून चांगल्या विचाराची पेरणी केली पाहिजे. तसेच धर्म, जात, पंत यापलिकडे जाऊन स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या चतुसुत्रीचा अवलंब केला तरच भारत विश्वगुरू बनेल, असेही डॉ. मुळे यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. के. मस्के म्हणाले, संत गाडगे महाराज यांच्या विचाराचे पाईक म्हणून रा. तु. भगत यांची ओळख आहे. शाहू, फुले, आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करवीरनगरी करीत आहे. माणसाला माणूस म्हणून जगता यावे, यासाठी या महापुरूषांचे योगदान महत्वाचे आहे. उत्तर साहित्यकृतीला विविध पुरस्कार देऊन गौरवल्यामुळे लेखकांना प्रेरणा मिळते. कारण चांगल्या विचारातूनच गद्य वाड्.मय निर्मिती होते. स्वागत व प्रास्ताविक एस. एम. पाटील यांनी केले. डॉ. एम. बी. शेख, विजया बनगे, सुहास याळ्ळगी यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त व्यक्ती व पाहुण्यांचा परिचय प्रा. जॉर्ज व्रुझ यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. सरोज बिडकर यांनी केले. एम. डी. देसाई यांनी आभार मानले. यावेळी सामाजिक, शिक्षण, साहित्यिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.