भारताला आज मोठ्या विजयाची गरज
वृत्तसंस्था/ चेन्नई
वरच्या फळीचा कमकुवतपणा आणि मोठ्या पराभवानंतर दबावामुळे अडचणीत आलेल्या गतविजेत्या भारताला आज गुऊवारी टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात झिम्बाब्वेचा सामना करताना शक्य तितकी सर्व ताकद दाखवावी लागेल. रविवारी दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 76 धावांनी झालेल्या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट (-3.80) घसरला आहे, त्यामुळे भारताच्या अस्तित्वासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी भारताला सलामीच्या आणि तिसऱ्या क्रमांकाभोवतीच्या समस्या सोडवण्याची गरज आहे.

पोटाच्या संसर्गानंतर अभिषेकचा फॉर्म हरवला आहे. संथ खेळपट्ट्या आणि ऑफस्पिनर्सनी त्याच्या फटकेबाजीला खीळ घातली आहे. तिलक वर्माने देखील सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अभिषेकच्या कमकुवत खेळामुळे तिलकने किशनला अधिक साहाय्यक भूमिका बजावली पाहिजे असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. किशन त्याच्या सभोवतालची वरची फळी निराशा करत असताना त्याच्या 193 च्या स्ट्राईक-रेटने प्रभावित करत आहे. सूर्यकुमार यादवने 180 धावा केल्या आहेत, पण त्या 127 च्या स्ट्राईक रेटने आल्या आहेत. त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 161 च्या स्ट्राईक-रेटपेक्षा ही आकडेवारी खूपच कमी आहे. त्यामुळे किशनवर सारी फटकेबाजी करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने गती दिली नसती, तर भारताला किमान दोन सामन्यांमध्ये चांगली धावसंख्या गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला असता. विरोधी संघांनी पॉवरप्लेमध्ये तीन डावखुऱ्या फलंदाजांविऊद्ध म्हणजे किशन, अभिषेक आणि तिलकविऊद्ध हुशारीने ऑफस्पिनर्सना मैदानात उतरविलेले आहे, जेणेकरून त्यांच्या धावांच्या संधी कमी व्हाव्यात. त्यामुळे संजू सॅमसनचा आघाडीच्या तीन फलंदाजांत समावेश हा एक जलद उपाय ठरू शकतो, परंतु केरळचा फलंदाज फॉर्ममध्ये नसल्याने पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा विचार करू शकते आणि तिलकला चौथ्या क्रमांकावर ढकलून वरच्या क्रमांकांवरील डावखुऱ्या फलंदाजांची मालिका खंडित करू शकते.
भारतासाठी अनुकूल ठरू शकणारी गोष्ट म्हणजे झिम्बाब्वेचे ग्रॅमी क्रेमर, सिकंदर रझा आणि रायन बर्ल हे फिरकी गोलंदाज या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने सामना केलेल्या इतर गोलंदाजांइतके प्रभावी नाहीत. परंतु त्यांचे जलद गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नगारावा आणि ब्रॅड इव्हान्स हे सुरात आलेल्या दिवशी फलंदाजांना सतावण्यास सक्षम आहेत. गोलंदाजीच्या आघाडीवर भारताला काळजी करण्याची फारशी गरज नाही. शिवाय दक्षिण आफ्रिकेविऊद्ध न खेळलेला डावखुरा फिरकी गोलंदाज आणि उपकर्णधार अक्षर पटेल पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
संघ-भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
झिम्बाब्वे: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रॅमी क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाईव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे माऊमनी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, तशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन बेनडरन मायर्स, डिओन बेनदरवानी.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7 वा.