भारत मोबिलिटी एक्स्पो-2025 17 जानेवारीपासून
34 ऑटो कंपन्यांसह दिग्गज कंपन्यांचा सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत मोबिलिटी एक्सपो 2025 चे आयोजन 17 ते 22 जानेवारी या दरम्यान भारत मंडपम, प्रगती मैदान, ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनाची दुसरी आवृत्ती असून या प्रदर्शनात 34 प्रमुख ऑटो निर्मात्या कंपन्या आणि 800 हून अधिक ऑटोघटक निर्मात्या कंपन्यांचा समावेश असणार आहे. याशिवाय इतर 1 हजार ब्रँडस्चा देखील सहभाग असेल, अशी माहिती आहे.
दुसरे भव्य प्रदर्शन
21 लाख चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या भव्य मैदानामध्ये ग्रेटर नोएडात प्रगती मैदानावर हे सदर प्रदर्शन भरवले जात असून 5 लाखापेक्षा अधिक जण या प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज बांधला जात आहे. या प्रदर्शनात सध्याच्या अस्तित्वात असलेल्या मॉडेल्ससह भारतीय बाजारात उतरवण्यात येणाऱ्या नव्या गाड्यांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवले जाणार आहे.
या कंपन्यांचा समावेश
मारुती सुझुकी याचसोबत टाटा मोटर्स, ह्युंडाई, महिंद्रा, टोयोटा यासारख्या दिग्गज कंपन्या भाग घेणार आहेत. देशातील मोठी दिग्गज कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी एसयुव्ही गटातील विटारा इलेक्ट्रिक कार प्रदर्शनामध्ये सादर करणार आहे. टाटा कर्व्ह ही इलेक्ट्रीक कार, हुंडाई क्रेटा, एमजी विंडसर यासारख्या गाड्यांना ही गाडी टक्कर देणार आहे. सदरची मारुतीची गाडी ही दोन बॅटरी पॅकसोबत येणार असल्याचे समजते. 49 केडब्ल्यूएच, 61 केडब्ल्यूएच या दोन बॅटऱ्या या गाडीला दिल्या जाणार आहेत.
नव्या गाड्यांचे सादरीकरण
याचप्रमाणे ह्युंडाई इंडिया देखील आपली नवी क्रेटा इलेक्ट्रिक गाडी प्रदर्शनात सादर करणार आहे. यासोबतच आयोनिक 6 आणि आयोनिक 9 या गाड्याही कंपनी सादर करू शकते. टाटा मोटर्स या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक सियेरा इव्ही आणि अविन्या या गाड्या सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचप्रमाणे आणखीन एक ऑटोमोबाईल निर्माती कंपनी महिंद्रा ऑटो यांनीदेखील आपल्या दोन गाड्या प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिंद्रा ईव्ही 6 आणि ईव्ही 9 इ या दोन गाड्यांचा समावेश आहे. कियादेखील या प्रदर्शनात आपली गाडी लॉन्च करणार असून यामध्ये एसयुव्ही प्रकारातील सिरॉस या गाडीचा समावेश असणार आहे. किया ईव्ही 9 व किया कार्निवल या गाडीसोबत ही अलीकडे सादर करण्यात आली होती. यासोबतच एमजी मोटर इंडियाने देखील प्रदर्शनासाठी आपली तयारी केली असून सायबस्टर कुप ही गाडी सादर करण्याची शक्यता आहे. टोयोटाची फॉर्च्युनर ही नवी गाडी प्रदर्शनामध्ये सादर केली जाऊ शकते. नव्या डिझाइनसह अनेक बदलांसोबत ही गाडी नव्याने सादर करण्यात आली आहे. फोक्सवॅगन इंडिया यांच्याकडूनही एसयुव्ही प्रकारामध्ये आयडी.फोर आणि आयडी.सिक्स या गाड्या सादर केल्या जाण्याची शक्यता आहे.