For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची एकतर्फी मालिका विजयाची संधी हुकली

06:55 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताची एकतर्फी मालिका विजयाची संधी हुकली
Advertisement

विंडीजचा पाच गड्यांनी विजय : कर्णधार हॉपचे नाबाद दीडशतक : राहुलचे शतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था, न्यू चंदीगड

कर्णधार शाय हॉपच्या नाबाद दीडशतकाच्या जोरावर विंडीजने शनिवारी येथे शेवटच्या सामन्यात भारताचा 5 गड्यांनी पराभव केला. विंडीजच्या या विजयामुळे भारताची या मालिकेतील एकतर्फी विजयाची संधी हुकली. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. वनडे क्रिकेटमध्ये विंडीजने सर्वाधिक धावांचा पाठलाग करत विजय नोंदविला आहे.

Advertisement

केएल राहुलचे नाबाद शतक तसेच रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान भारताने शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात विंडीजला विजयासाठी 352 धावांचे आव्हान दिले. भारताने 50 षटकात 7 बाद 351 धावा जमविल्या. रोहितचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. त्यानंतर विंडीजच्या डावामध्ये कर्णधार हॉपने 143 चेंडूत 3 षटकार आणि 17 चौकारांच्या मदतीने नाबाद 162 धावांची तर अमीर जंगूची 67 धावांची खेळी वैशिष्ट्यो ठरली.

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून यापूर्वी विजयी आघाडी मिळवली आहे. या शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारताच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. पहिल्या 3 षटकांमध्ये भारताचे दोन आघाडीचे फलंदाज कर्णधार गिल आणि विराट कोहली सेल्सच्या गोलंदाजीवर तंबूत परतले होते. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सेल्सने गिलला यष्टीरक्षक हॉपकरवी झेलबाद केले. तर त्यानंतर सेल्सने आपल्या या षटकातील पुढील चेंडूवर कोहलीचा त्रिफळा उडविला. कोहलीला आपले खाते उघडता आले नाही.

रोहित शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी अत्यंत सावधपणे फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. या जोडीने 22 षटकात 137 धावांची शतकी भागिदारी केली. पहिल्या 10 षटकात भारताने 28 धावा जमविताना 2 गडी गमविले होते. शर्मा आणि गायकवाड या जोडीने शतकी भागिदारी 105 चेंडूत नोंदविली. शर्माने 58 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकविले. तर गायकवाडने 64 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. रोहित शर्मा पॉलच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचण्याच्या नादात अँड्रीव्हकरवी झेलबाद झाला. त्याने 85 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 92 धावांची खेळी केली. या मालिकेतील त्याचे सलग दुसरे शतक केवळ 8 धावांनी हुकले. शर्मा बाद झाल्यानंतर गायकवाड अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. सेल्सने आपल्या दुसऱ्या हप्त्यातील गोलंदाजीत गायकवाडला कॅम्पबेलकरवी झेलबाद केले. त्याने 69 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारासह 57 धावा जमविल्या. नितीशकुमार रे•ाr पॉलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 9 धावा जमविल्या. भारताची यावेळी स्थिती 36 षटकात 5 बाद 225 अशी होती. नवोदित नमन धीरने 21 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा जमविताना राहुल समवेत पाचव्या गड्यासाठी 65 धावांची भर घातली.

राहुलने एका बाजूने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात 218 धावा जमविताना 3 गडी गमविले. तर भारतीय फलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात 105 धावा झोडपताना 2 गडी गमविल्याने भारताला 350 धावांचा टप्पा गाठता आला. राहुलने 41 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. तर त्याने 80 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह शतक पूर्ण केले. कंबोजने 9 चेंडूत 2 षटकारांसह 17 धावा जमविल्या. तसेच त्याने राहुल समवेत सातव्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. राहुलला ब्रारकडून चांगली साथ लाभली. या जोडीने आठव्या गड्यासाठी अभेद्य 61 धावांची भागिदारी 26 चेंडूत झळकवली. राहुलने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून संघाला सुस्थितीत नेले. राहुलने 87 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 129 धावा झळकाविल्या. भारताच्या डावामध्ये 17 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे सेल्सने 62 धावांत 3 तर किमो पॉलने 71 धावांत 2 तर मोतीने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कॅम्पबेल आणि कर्णधार हॉप यांनी सलामीच्या गड्यासाठी 25 चेंडूत 41 धावांची भागिदारी केली. मोहम्मद सिराजच्या यॉर्करवर कॅम्पबेलचा त्रिफळा उडाला. त्याने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. 10 षटकाअखेर विंडीजने 1 बाद 78 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार हॉप 6 चौकारांसह 39 तर अमीर जंगू 2 चौकारांसह 22 धावांवर खेळत होते. जंगू आणि हॉप या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची शतकी भागिदारी केली. जंगू चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 56 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 67 धावा जमविल्या. रुदरफोर्डने 25 चेंडूत 2 चौकारांसह 24 तर पॉलने 35 चेंडूत 5 चौकारांसह 44 धावा जमविल्या. मॅथ्यू फोर्डने 7 धावा केल्या. हॉप आणि मोती या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मोतीने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 19 धावा केल्या. हॉपने रुदरफोर्ड समवेत तिसऱ्या गड्यासाठी 56 धावांची भर घातली. भारतातर्फे मोहम्मद सिराज, ब्रार, कुलदीप यादव आणि नमन धीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजच्या डावामध्ये 5 षटकार आणि 34 चौकार नोंदविले गेले. आता या वनडे मालिकेनंतर उभय संघातील टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक - 50 षटकात 7 बाद 351 (केएल राहुल नाबाद 129, रोहित शर्मा 92, गायकवाड 57, नमन धीर 30, कंबोज 17, ब्रार नाबाद 8, अवांतर 8, सेल्स 3-62, पॉल 2-71, मोती 1-67), विंडीज 48.2 षटकात 5 बाद 352 (हॉप नाबाद 162, अमीर जंगू 67, रुदरफोर्ड 24, पॉल 44, कॅम्पबेल 10, फोर्ड 7, मोती नाबाद 19, अवांतर 19, मोहम्मद सिराज, ब्रार, कुलदीप यादव आणि नमन धीर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.