भारत, मालदिव, पाक एकाच गटात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
2026 साली होणाऱ्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार विद्यमान विजेता भारत, मालदीव आणि पाक यांचा ब गटात समावेश आहे. या स्पर्धेचा ड्रॉ भूतानमध्ये काढण्यात आला.
उपखंडातील ही पंधरावी सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धा ढाका येथे 4 ते 17 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना मालदीव बरोबर 5 नोव्हेंबर रोजी तसेच पाकिस्तानबरोबर 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान यांचा अ गटात समावेश आहे. फिफाने यापूर्वी अखिल नेपाळ फुटबॉल संघटनेवर निर्बंधाचा निर्णय घातला होता. पण आता या निर्बंध कालावधीची मुदत 1 सप्टेंबर रोजी संपणार आहे. नेपाळचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.
2026 सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 6 संघांचा समावेश असून प्रत्येक गटातील आघाडीचे 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 14 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे तर 17 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळविला जाईल. भारतीय फुटबॉल संघाने पाकविरुद्ध आतापर्यंत झालेल्या एकूण 25 लढतीपैकी 16 लढती जिंकल्या आहेत. 2023 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत भारत-पाक यांच्यात शेवटची गाठ पडली होती आणि त्यामध्ये भारताने पाकवर 4-0 असा एकतर्फी विजय नोंदविला होता. भारत आणि मालदीव यांच्यात आतापर्यंत 18 सामने झाले असून त्यापैकी 13 सामने भारताने जिंकले असून 3 सामने गमविले आहेत तर 2 सामने अनिर्णित राहिले. 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015, 2021 आणि 2023 साली ही स्पर्धा घेण्यात आली होती. 2023 च्या सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकावले होते.