For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-मलेशिया ऐतिहासिक मैत्री नव्या उंचीवर

06:43 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत मलेशिया ऐतिहासिक मैत्री नव्या उंचीवर
Advertisement

मलेशियाला प्राचीन काळात सुवर्णभूमी म्हटले जात असे. मलेशियामध्ये श्रीविजय घराण्याने राज्य करून येथे हिंदू कला व स्थापत्याचा प्रसार केला. पंधराव्या शतकाच्या प्रारंभी परमेश्वर हा राजा इष्कंदर शाह बनला आणि मलेशियावर इस्लामचा पगडा वाढू लागला, परंतु तरी देखील मलेशियातील लोकांनी आपली स्थानिक संस्कृती, भारतीय संस्कृती आणि नंतर पडलेल्या सर्व प्रभावांचा स्वीकार करून आपले बहुसंस्कृतिक उदार व सहिष्णू व्यक्तिमत्व जोपासले आहे. त्यामुळे विविधतेतील एकता हा दोन्ही देशांतील एक समान धागा आहे. किंबहुना भारत-मलेशिया मैत्रीचा तो आत्मा आहे. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी हा आत्मा यथार्थपणे जोपासला आहे. त्यामुळे भारत मलेशिया मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे.

Advertisement

मलेशियाच्या आखाताशिवाय खंबायत राहू शकत नाही आणि खंबायतच्या आखाताशिवाय मलेशिया राहू शकत नाही, या ऐतिहासिक सत्याची प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यामुळे आली. प्राचीन काळी एक मसाल्याची पिशवी सोन्याच्या पिशवी एवढी मानली जात असे. त्यामुळे 3000 वर्षापासून भारत आणि मलेशिया यांच्यातील सागरी संबंध हे सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय पातळीवर सातत्याने नवे रूप घेत होते. संपूर्ण आग्नेय आशियातील या सांस्कृतिक प्रक्रियेचे वर्णन कोडेस या फ्रेंच पुरातत्त्वज्ञाने भारतीय करण असे केले होते. या सत्याची पुन्हा एकदा प्रचिती भारत-मलेशिया ऐतिहासिक मैत्रीच्या अभ्युदयाने आली आहे. भारताच्या व्हिजन महासागर तसेच हिंद प्रशांत क्षेत्रातील शांतता प्रगती व स्थैर्याची हाक या धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून भारत -मलेशिया मैत्रीकडे पाहिले पाहिजे.

बृहत्तर भारताची प्रतिष्ठा

Advertisement

भारत-मलेशिया ऐतिहासिक मैत्री ही उभय राष्ट्रातील सांस्कृतिक संबंधांची वेळ भक्कम करणारी आहे. प्राचीन काळात कौंडिण्य ऋषींनी मलेशियाच्या सुवर्णभूमीत पहिले पाऊल ठेवले आणि तेथील राजकन्येशी विवाह केला तेव्हापासून भारत-मलेशिया यांच्या सातत्यपूर्ण मैत्रीला प्रारंभ झाला. आज मलेशियामध्ये 2.9 लाख भारतीय राहतात तसेच दोन्ही देशांमध्ये पर्यटकांची संख्या लाखोंनी वाढत आहे. भारताच्या वाढत्या प्रभुत्वाबरोबर मलेशियालाही त्याचा अभिमान वाटणे साहजिक आहे.

लोकप्रियतेच्या शिखरावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलेशियात लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, तेथील अनिवासी भारतीयांनी त्यांच्या स्वागतासाठी 800 निवडक नर्तिकांनी ‘स्वागतम शुभ स्वागतम’ हे गीत भारतीय नृत्य ओडिसी भरतनाट्याम इत्यादीच्या रूपाने सादर केले. मलेशियात भारतीय चित्रपटांची लोकप्रियता तसेच तामिळ भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा दबदबा व त्यातून होत असलेली रोजगार निर्मिती यामुळे भारत-मलेशिया संबंधाला आता नवी आर्थिक बैठक प्राप्त झाली आहे. उभय देशातील व्यापार हा 20 अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे आणि पुढे तो नव्या दिशेने आगेकूच करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांसमोर केलेले स्फूर्तीदायक भाषण म्हणजे दोन्ही देशातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक संबंधांना नवा उजाळा देणारे ठरले. या भाषणामध्ये त्यांनी समान सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या दोन्ही देशांनी आता उज्वल भविष्याच्या आणि समृद्ध स्वयंपूर्ण राष्ट्रांच्या उभारणीसाठी करावयाच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. अत्यंत उत्स्फूर्तपणे अनिवासी भारतीयांनी मोदी मोदीचा घोष करून त्यांचे स्वागत केले. त्यातच त्यांच्या लोकप्रियतेची पावती दिसून आली

प्रमुख सामंजस्य करार

भारत आणि मलेशिया दरम्यान संमत झालेले 11 सामंजस्य करार हे दोन्ही देशातील परस्परपूरक सहकार्याची पावती देणारे आहेत. अशा प्रमुख करारामध्ये प्रामुख्याने समान राजकीय दृष्टिकोनाबरोबरच डिजिटल प्रणाली, आर्थिक सहकार्य तसेच ऊर्जा आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील आदानप्रदान संरक्षण व सुरक्षा भागीदारी शिक्षण, कौशल्य विकास संस्कृती पर्यटन, लोकसंपर्क, आरोग्य सेवा क्षेत्रातील सहकार्य शाश्वत विकास क्षेत्रातील नवे प्रयोग प्रादेशिक व बहुपक्षीय सहकार्य अशा प्रमुख घटकांचा समावेश आहे.

 प्रमुख फलश्रुती कोणत्या

उभय देशातील असलेले स्नेहसंबंध आता नव्या करारामुळे अधिक भक्कम झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया भेटीतील प्रमुख फलश्रुती काय असेल तर ती म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्रातील धाडसी पाऊल होय. मलेशियाचा याबाबतीतला पूर्वानुभव भारताला पथदर्शक ठरणार आहे, शिवाय संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील नियमित लष्करी सराव हवाई व नौदल प्रशिक्षणे याबरोबरच संरक्षण उत्पादनातील करार हे उभयताना हितवर्धक ठरले आहेत. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने 47 कलमी घोषणापत्र जाहीर केले आहे त्यातील ठळक तरतुदीचा पुढे परामर्श घेतला आहे

आर्थिक व तांत्रिक सहकार्य

पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात संयुक्त संशोधन करण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्त संशोधनासाठी परस्पर आदानप्रदान करण्यासाठी विशेष करार केला आहे. या देवाण घेवाणीमुळे दोन्ही देशांना या क्षेत्रात दमदार वाटचाल करता येईल. डिजिटल पेमेंट प्रणाली ही एक मोठी उपलब्धी आहे. भारताच्या एनआयपीएल इंटरनॅशनल यंत्रणा आणि मलेशियाच्या पे नेट या संस्थेने यूपीआय आधारित क्रॉस बॉर्डर पेमेंटसाठी एक नवा करार केला आहे. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांना पेमेंट करणे सोपे जाईल. वाढत्या पर्यटनाला गती देण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे. तसेच स्थानिक चलनाचा वापर ही सुद्धा एक नवी उपलब्धी आहे, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी भारतीय रुपयांमध्ये तसेच मलेशियन रंगीत चलनाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. या सर्व करारामुळे दोन्ही देशातील व्यापार पर्यटन याला निश्चितच गती लाभेल.

 संरक्षण आणि सुरक्षा

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य दोन्ही देशांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी पोषक ठरणार आहे. विशेषत: दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे की दहशतवादाविरुद्ध 0 सहिष्णुता असली पाहिजे. या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही तसेच या प्रश्न दुटप्पी भूमिका ही घेता कामा नये, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले आहे. ते मलेशियाने मान्य केले आहे. संरक्षण क्षेत्रात संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देश समान भूमिका घेऊन प्रशिक्षणाच्या आधारे आपल्या तीनही दलांचे संयुक्त संचलन करत आहेत, करत राहतील. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रामध्ये एक नवे पर्व सुरू होत आहे. शिवाय संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता अभियानात दोन्ही देशांचा सहभाग महत्त्वाचा आहे. संयुक्त राष्ट्र शांतता अभियान सहकार्याचे नूतनीकरण करण्यासाठी प्रस्तावाची देवाणघेवाण करण्यात आली आहे.

शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य

शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य हा या सर्व करारांचा प्रमुख आत्मा आहे. मलेशियातील तामिळ संस्कृतीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन पंतप्रधानांनी  तिरवल्लूवर संशोधन केंद्र आणि शिष्यवृत्ती योजना घोषित केली. तेथील मलाया विद्यापीठात एक विशेष संशोधन केंद्र तामिळ महाकवीच्या नावाने सुरू करण्याची घोषणा ही अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे मलाया विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल तसेच त्यांच्या तामिळ शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याचा निर्णयसुद्धा स्वागतार्ह आहे. पंतप्रधानांनी मलेशियामध्ये नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली आहे. भारताच्या नवरंगी अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य लक्षात घेऊन दोन्ही देश दृकश्राव्य कलाकृती निर्माण करण्यासाठी करारबद्ध झाले आहेत. चित्रपट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या क्षेत्रात संयुक्त निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापक करार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील सर्जनशील कलावंतांना मोठ्या संधी मिळतील.

आजवरच्या भारत-मलेशिया संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचे कार्य पंतप्रधान मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यामुळे साध्य झाले आहे. तसेच सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात सुद्धा महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. संकट काळात परस्पर सहकार्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे कुठल्याही आपत्ती प्रसंगी दोन्ही देश एकमेकांच्या सुखदु:खात सामील होऊ शकतात. आरोग्य आणि आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सुद्धा दोन्ही देशांचे भक्कम सहकार्य अपेक्षित आहे. पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात संशोधनाला गती देण्यासाठी एक नवा करार करण्यात आला आहे. या कराराचे अंतिम स्वरूप आयुर्वेद मंत्रालयाने साकार केले आहे. क्षेत्र कुठलेही असो सुरक्षा असो की संरक्षणाचे, ऊर्जा असो की सेमीकंडक्टर असो किंवा शिक्षण संस्कृती व पर्यटनाचे क्षेत्र असो या सर्व बाबतीत दोन्ही देशानी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. नजिकच्या भविष्यकाळात आशियातील वाघ आणि सिंह हे एकत्र गर्जना करू शकतील. या गरजेतून आशियन टायगरचे पर्व वाढेल. आशियाचा हा बुलंद आवाज अनेक देशांची झोप उडवून टाकणारा ठरेल. मलेशियामुळे या कराराला आणि या नव्या महापर्वाला प्रारंभ झाला आहे असे म्हणावे लागेल. एकीकडे दहशतवादाचे उच्चाटन आणि दुसरीकडे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठीसुद्धा उभय राष्ट्रातील सर्वोच्च संस्थांनी सामंजस्य करार केला आहे. मलेशिया हा आशियान परिषदेचा अध्यक्ष होता आणि या कार्यकाळात मलेशियाने केलेल्या कार्याचे तथा भरीव योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान श्री अन्वर इब्राहिम यांची वैयक्तिक मैत्री ही सुद्धा उभय राष्ट्रातील संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाणारी ठरली आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र भाई मोदी शेजारी राष्ट्रातील प्रमुखांचे मन जिंकतात आणि त्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करतात ती त्यांची शैली खरोखरच स्पृहणीय आहे.

                  प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.