भारत-मलेशिया फुटबॉल सामना 18 रोजी
वृत्तसंस्था/हैद्राबाद
भारत-मलेशिया यांच्यातील फुटबॉल क्षेत्रातील द्वंद्व चांगलेच परिचित असून आता पुन्हा या दोन संघातील फुटबॉल सामना पाहण्याची संधी शौकिनांना लाभणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी हैद्राबादमध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात मित्रत्वाचा फुटबॉल सामना खेळविला जाणार आहे.
भारत आणि मलेशिया यांच्यात 1957 साली कौलालंपूरमध्ये पहिला मित्रत्वाचा फुटबॉल सामना खेळविला गेला होता आणि भारताने मलेशियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. या सामन्यात भारताच्या पी. के. बॅनर्जीने 2 गोल तर तुळशीदास बलरामने 1 गोल केला होता. त्यानंतर उभय संघात गेल्यावर्षी मेर्डेका फुटबॉल स्पर्धेत लढत झाली होती आणि मलेशियाने भारतावर 4-2 अशा गोल फरकाने विजय मिळविला होता. भारत आणि मलेशिया यांच्यात आतापर्यंत 32 सामने खेळविले गेले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 सामने जिंकले असून 8 सामने बरोबरीत राहिले आहेत. फिफाच्या मानांकनात भारत सध्या 125 व्या तर मलेशिया 133 व्या स्थानावर आहे.