भारत-मलेशिया फुटबॉल लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/ हैद्राबाद
येथील बालयोगी स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात यजमान भारताला मलेशियाने 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्यातील निकालामुळे भारतीय फुटबॉल संघाला 2024 च्या फुटबॉल हंगामाअखेर एकही सामना जिंकता आला नाही.
भारत आणि मलेशिया यांच्यातील सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर 19 व्या मिनिटाला पावलो जोशुने भारतीय गोलरक्षक गुरुप्रितसिंग संधूला हुलकावणी देत शानदार गोल केला. पण 39 व्या मिनिटाला राहुल भेकेने हेडरद्वारे गोल नोंदवून भारतीय संघाला या सामन्यात बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे गोल बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तराधार्थ दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर अधिक भर दिला. क्वचीत काही चढाया भारताकडून झाल्या. पण मलेशियाच्या भक्कम गोलरक्षणामुळे भारताला निर्णायक गोल करता आला नाही. भारत आणि मलेशिया या दोन संघामध्ये 32 सामने झाले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 सामने जिंकले असून 8 सामने बरोबरीत राहिले. फिफाच्या मानांकनात भारत सध्या 125 व्या स्थानावर आहे. सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या आघाडी फळीने शानदार चढाया करत मलेशियन बचावफळीवर दडपण आणले होते. दरम्यान मलेशियाच्या खेळाडूंना स्थिर होण्यासाठी काही कालावधी लागला. भारतीय संघात तब्बल 10 महिन्यानंतर पुनरागमन करणारे वरिष्ठ फुटबॉलपटू संदेश जिनगेन याच्या कामगिरीमुळे मलेशियन बचावफळी झगडत होती. भारताने या सामन्यात 4-2-3-1 असे तंत्र अवलंबले होते. भारतीय संघातील चेंगटेने उजव्या बगलेतून केलेल्या चालीच्या जोरावर भारतीय संघाला आपले खाते उघडता आले. भारतीय संघाला मॅनेलो मारक्वेझ हे प्रमुख प्रशिक्षक लाभले असून त्यांच्या प्रशिक्षकाच्या कारकिर्दीत भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मॅनेलो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाने मॉरिशसबरोबरचा यापूर्वी झालेला सामना गोल शुन्य बरोबरीत राहिला. तर आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात सिरीयाने भारताचा 3-0 असा पराभव केला होता. त्यानंतर शेवटच्या मित्रत्वाच्या सामन्यात भारताने व्हिएतनामला 1-1 असे बरोबरीत रोखले होते.