भारत-मलेशिया आठ सामन्यांची हॉकी मालिका
वृत्तसंस्था, बेंगळूर
यजमान भारत आणि मलेशिया यांच्यातील 21 वर्षाखालील पुरुष हॉकी संघामध्ये 8 सामन्यांची हॉकी मालिका 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान साईच्या नेताजी सुभाष क्रीडा केंद्राच्या मैदानावर होणार आहे.
मलेशियाचा 21 वर्षाखालील पुरुषांचा संघ या मालिकेत भारतीय कनिष्ठ पुरुष संघाबरोबर 5 सामने खेळणार असून तसेच साई संघाबरोबर 3 सामने खेळणार आहे. आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या दृष्टिकोनातून भारत आणि मलेशिया या दोन्ही संघांना ही मालिका उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाची मलेशियाबरोबरचे सामने 7, 8, 10, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी खेळविले जातील. त्याच प्रमाणे मलेशिया आणि साई संघामधील सामने 3, 5 आणि 15 ऑगस्ट रोजी होणार आहेत. आगामी कनिष्ठांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ठ हॉकी संघाला सरावाच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची राहणार आहे. या मालिकेमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या हॉकीपटूंना अधिक मदत होईल.