भारत, मलेशिया, सिंगापूर एका गटात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
17 वर्षाखालील वयोगटाच्या एएफसी पुरुषांच्या आशियाई चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ कौलालंपूरच्या मुख्यालयात काढण्यात आला. या ड्रॉ नुसार भारताचा ई गटात समावेश असून या गटात मलेशिया, पॅलेस्टाईन, सिंगापूर, गुआम यांचाही समावेश आहे.
एएफसी 17 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांची प्रमुख स्पर्धा 2027 मध्ये उझबेकिस्तान येथे होणार आहे. तर 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मलेशियात होणारी पात्रता फेरीची स्पर्धा सिंगल राऊंडरॉबिन पद्धतीने खेळविली जाणार आहे.
या पात्रता फेरीच्या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 11 नोव्हेंबर रोजी सिंगापूर बरोबर, दुसरा सामना 14 नोव्हेंबरला गुआमबरोबर, तिसरा सामना पॅलेस्टाईनबरोबर 17 नोव्हेंबरला, चौथा सामना 20 नोव्हेंबरला यजमान मलेशियाबरोबर होणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेत एकूण 35 संघांचा समावेश असून ते 7 गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटात 5 संघांचा सहभाग आहे. प्रत्येक गटातील विजेता संघ उझबेकमध्ये 12 ते 29 मे 2027 दरम्यान होणाऱ्या एएफसी 17 वर्षाखालील वयोगटातील आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल.