बॉक्सम एलिटमध्ये भारताची विजयी सुरुवात
हितेश गुलिया, प्रीती यांची दमदार कामगिरी
वृत्तसंस्था / अलिकान्ते (व्हॅलेन्सिया)
21 देशांतील 214 मुष्टियोद्धे सहभागी झालेल्या प्रतिष्ठित बॉक्सम एलिट आंतरराष्ट्रीय 2026 स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने दमदार कामगिरी करत आपल्या मोहिमेची शानदार सुरूवात केली. जागतिक बॉक्सिंग कप फायनल्सचे विजेते हितेश गुलिया (70 किलो) आणि प्रीती (54) यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. या दोघांनीही सहज विजय मिळवले तर भारताने अनेक वजन गटांमध्ये विजय नोंदविले.
एलिट पुरूषांच्या 70 किलो गटातील लढतीत हितेशने पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि नेदरलँड्सच्या फिन बॉसला 5-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. तत्पूर्वी एलिट महिलांच्या 54 किलो गटात प्रीतीने कझाकस्तानच्या आलियास्कर सिंतबरवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून भारतासाठी विजयाची सुरूवात केली. तिने धारदार ठोक्यांचे संयोजन आणि शिस्तबद्ध बचावाच्या जोरावर आपल्या प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे निष्प्रभ केले. भारताच्या महिला खेळाडूंनी आपली विजयी मालिका कायम ठेवत प्राची (57 किलो), प्रिया (60 किलो) आणि काजल (65 किलो) यांनीही दिमाखात आगेकूच केली. प्राची आणि प्रिया यांनी अनुक्रमे स्पेनच्या व्हेनेसा मोरेल रामिरेझ आणि कॅनडाच्या अलेसिया मॅनसुएटो यांच्यावर 5-0 असे एकसारखे विजय मिळविले तर काजलने एका चुरशीच्या लढतीत कझाकस्तानच्या असीम तनातारवर 4-1 ने मात केली.
पुरूषांच्या गटातही भारताने आत्मविश्वासाने केलेल्या कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणला. सचिनने (60 किलो) स्पेनच्या बँडन अलेजांद्रेवर 5-0 ने वर्चस्व गाजवले तर मोहम्मद हुसामुद्दीनने (60 किलो) डेन्मार्कच्या माटियास मेहमेत बुयुकडेमिरवर 4-1 ने विजय मिळवला. अभिनव जामवालने (65 किलो) डेन्मार्कच्या कालिद उस्मानवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून प्रभावित केले तर दीपकने (70 किलो) बेल्जियमच्या हॉर्नेल आयटेवीविरुद्ध 4-1 असा दमदार विजय मिळवला. आकाश (75 किलो) आणि अंकुश (80 किलो) यांनीही 4-1 च्या फरकाने विजय मिळवत आगेकूच केली तर आदित्य प्रताप यादव (65 किलो) इंग्लंडच्या जो टर्नरविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत पराभूत होवून स्पर्धेतून बाहेर पडला.
बॉक्सम एलिट 2026 - पहिल्या दिवसाचे निकाल
54 किलो गट: प्रीती विजयी विरुद्ध अलीअस्कर सिंबत (कझाकस्तान) 5-0
57 किलो गटात प्राची विजयी वि. व्हेनेसा मोरेल रामिरेझा (स्पेन) 5-0
60 किलो गटात प्रिया विजयी वि. अलेसिया मॅनसुएटो (कॅनडा) 5-0
65 किलो गटात काजल विजयी वि. असीम तनातार (कझाकस्तान) 4-1
एलिट पुरूष
60 किलो गटात मोहम्मद हुसामुद्दीन विजयी वि. मटियास मेहमेत बुयुकडेमिर (डेन्मार्क) 4-1
60 किलो गटात सचिन विजयी वि. ब्रँडन अलेहांद्रो (स्पेन) 5-0
65 किलो गटात आदित्य प्रताप पराभूत वि. जो टर्नर (इंग्लंड) 1-4
65 किलो गटात अभिनव जमवाल विजयी वि. कालिद उस्मान (डेन्मार्क) 5-0
70 किलो गटात हितेश गुलिया विजयी वि. फिन बोस (नेदरलँड्स) 5-0
70 किलो गटात दीपक विजयी वि. हॉर्नेल आयटेवी (बेल्जियम) 4-1
75 किलो गटात आकाश विजयी वि. निकिता झाखारचेन्को (युक्रेन) 4-1
80 किलो गटात अंकुश विजयी वि. माल्सावमतलुआंगा (भारत) 4-1).