डब्ल्यूटीसी क्रमवारीत भारताने गमावले अव्वल स्थान
वृत्तसंस्था/ दुबई
भारताने जागतिक कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान गमावले आहे. रविवारी न्यूझीलंडविऊद्ध मायदेशात झालेल्या लाजिरवाण्या मालिका पराभवानंतर दुसऱ्या स्थानावर त्यांची घसरण झाली आहे. 1999-2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने मालिका जिंकल्यानंतर घरच्या कसोटी मालिकेतील हा त्यांचा पहिलाच पराभव आहे. चालू असलेल्या जागतिक कसोटी स्पर्धेचा विचार करता भारताचा हा पाचवा पराभव असून यामुळे त्यांच्या गुणांच्या टक्केवारीत लक्षणीय घट होऊन ती 62.82 वरून 58.33 वर घसरली आहे.
भारत विद्यमान विजेता ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाने 62.50 सह पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. भारत आता पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका खेळण्यासाठी रवाना होणार असून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण दोन्ही संघ अव्वल दोन स्थानांसाठी स्पर्धा करणार आहेत. इतर निकालांवर अवलंबून न राहता सलग तिसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीने भारताला आता त्यांच्या उर्वरित पाच सामन्यांपैकी चार जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची स्थिती चांगली आहे. कारण त्यांना त्यांच्या उर्वरित सातपैकी चार कसोटी जिंकणे आवश्यक आहे.
न्यूझीलंडच्या भारतातील ऐतिहासिक क्लीन स्वीपने त्यांच्या आकांक्षांनाही बळ दिले आहे. ते 54.55 सह चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत, तर श्रीलंका 55.56 सह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका सध्या 54.17 सह पाचव्या स्थानावर असला, तरी ते देखील अव्वल दोन स्थानांसाठीच्या शर्यतीत आहेत.