For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहित-गिलचा शतकी धमाका, भारताकडे 255 धावांची आघाडी

06:58 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहित गिलचा शतकी धमाका  भारताकडे 255 धावांची आघाडी
Advertisement

इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी : सर्फराज खान, पदार्पणवीर देवदत्त पडीक्कलची अर्धशतके 

Advertisement

वृत्तसंस्था/ धरमशाला

येथे सुरु असलेल्या पाचव्या कसोटीवर टीम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 218 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 8 गडी गमावत 473 धावा केल्या. भारताकडे आता 255 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस बुमराह 19 व कुलदीप यादव 27 धावांवर खेळत होते. भारताकडून आजच्या दिवसात दोन शतके आणि दोन अर्धशतके नोंदवली गेली. रोहित शर्माने 103 तर शुभमन गिलने 110 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर सर्फराजने 56 आणि पदार्पण करणाऱ्या पडिक्कलने 65 धावा करत मोठी भागीदारी रचली.

Advertisement

प्रारंभी, टीम इंडियाने 1 बाद 135 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. कर्णधार रोहित व शुभमन गिल यांनी इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. रोहित आणि गिल या दोघांनीही शानदार फलंदाजी करताना शतके झळकावली. पण यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक चाल खेळली आणि भारताला मोठा धक्का दिला. बेन स्टोक्स स्वत: गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला क्लीन बोल्ड करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. रोहितने 10 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 103 धावांची दमदार खेळी साकारली. रोहित बाद झाल्यानंतर गिलने देखील गिलने शतक झळकावले, पण त्यानंतर गिलदेखील जास्त काळ टिकला नाही. जेम्स अँडसरसनने यावेळी गिलला बाद केले. गिलने 12 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर 110 धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 171 धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे, कर्णधार रोहितचे हे इंग्लंडविरुद्ध मालिकेतील दुसरे तर कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक ठरले तर गिलने देखील या मालिकेतील दुसरे तर कारकिर्दीतील चौथे शतक साजरे केले.

सरफराज-पडिक्कलची अर्धशतके

रोहित आणि गिल हे सेट झालेले फलंदाज एकामागून एक बाद झाले आणि भारतावर दडपण वाढले होते. पण, सर्फराज व पदार्पणवीर देवदत्त यांनी 97 धावांची भागीदारी साकारत संघाला पावणेचारशेचा टप्पा गाठून दिला. तिसरा कसोटी सामना खेळणाऱ्या सर्फराजचे हे या मालिकेतील तिसरे अर्धशतक आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सर्फराजने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानं अवघ्या 55 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो 60 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. सर्फराज पाठोपाठ पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या पडिक्कलनं षटकार ठोकून आपले पहिलेवहिले अर्धशतक साजरे केले. पडिक्कल 103 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याला शोएब बशीरने बोल्ड केले. सर्फराज व पडिक्कल बाद झाल्यानंतर भारताचा डाव घसरला. दुसरा दिवस संपण्यासाठी काही षटके शिल्लक असतानाच जडेजा आणि जुरेल प्रत्येकी 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर आपली 100 वी कसोटी खेळणाऱ्या अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे भारताची अवस्था 4 बाद 427 पासून 8 बाद 428 अशी झाली.

कुलदीप-बुमराहने सावरला डाव

428 धावांवर 8 विकेट पडल्यानंतर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी नवव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. या दोघांनी फिरकीपटूंबरोबरच इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचाही सामना केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 120 षटकांत 8 बाद 473 धावा केल्या होत्या. बुमराह 2 चौकारासह 19 तर कुलदीप 2 चौकारासह 27 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 218

भारत पहिला डाव 120 षटकांत 8 बाद 473 (यशस्वी जैस्वाल 57, रोहित शर्मा 103, शुभमन गिल 110, पडिक्कल 65, सर्फराज 56, कुलदीप खेळत आहे 27, बुमराह खेळत आहे 19, शोएब बशीर 170 धावांत 4 बळी, हार्टली 126 धावांत 2 बळी, अँडरसन व स्टोक्स प्रत्येकी एक बळी).

नऊ महिन्यानंतर पहिला चेंडू टाकला आणि थेट रोहितचा त्रिफळा उडवला

धरमशाला येथील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी इंग्लिश फलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहित आणि गिलने इंग्लिश गोलंदाजांचा अक्षरश: घाम काढला. जेम्स अँडरसन, मार्क वूड, टॉम हार्टली आणि शोएब बशीर या चौघांनाही रोहित-गिलला बाद करता येत नव्हते. संघ अडचणीत असल्याचे पाहून कर्णधार बेन स्टोक्स  गोलंदाजीला आला. विशेष म्हणजे, दुखापतीच्या कारणास्तव स्टोक्सने जून 2023 नंतर एकही चेंडू टाकला नव्हता. पण पुन्हा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर स्टोक्सला पहिल्याच चेंडूवर रोहितची विकेट मिळाली. स्टोक्सचा गुड लेन्थ बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि रोहितचा त्रिफळा उडाला. हा एक जादुई चेंडू होता, जो पाहून सगळेच थक्क झाले.

हिटमॅनचा आणखी एक भन्नाट विक्रम

रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक झळकावले. या शतकी खेळीसह त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. रोहितचे हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील नववे शतक ठरले. डब्ल्यूटीसी स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 13 शतके झळकावली आहेत. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन असून त्याने 11 शतके झळकावली आहेत. यानंतर केन विल्यम्सन 10 शतकासह तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा व स्टीव्ह स्मिथ 9 शतकासह चौथ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित सोडला तर कोणत्याही भारतीय खेळाडूला इतकी शतके करता आलेली नाहीत.

सर्फराजचा भन्नाट शॉट, वूडची केली धुलाई

मार्क वूड 76 वी ओव्हर टाकत होता. यावेळी वूडने ओव्हरमधील एक बॉल जवळपास 150 किमी वेगाने टाकला. सर्फराजने या बॉलवर चोख प्रत्युत्तर दिलं. सर्फराजने शरीराचा तोल सावरत शॉर्ट पिच बॉलवर मागच्या बाजूला बसून थर्ड मॅनकडे एक भन्नाट चौकार लगावला. सर्फराजच्या या रॅम्प शॉटने चाहत्यांना सचिन तेंडुलकरच्या रॅम्प शॉटची आठवण करून दिली. तेंडुलकर अनेकदा वेगवान गोलंदाजांना असे फटके खेळताना दिसला आहे.

Advertisement
Tags :

.