युएन’मध्ये भारताचा पुन्हा पाकिस्तानवर हल्लाबोल
दहशतवादावरून पाकिस्तानवर टीका; कारगिल युद्धाचा उल्लेख
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र
दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. भारताने शेजारी देशाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताने स्थलांतरितांच्या मानवाधिकारांवरील संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींचा अहवालही फेटाळला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रथम सचिव, भाविका मंगलानंदन यांनी भारताच्या वतीने उत्तर दिले.
पाकिस्तानला लक्ष्य करत मंगलानंदन यांनी शेजारी देशात दहशतवादी उघडपणे कार्यरत असल्याचा दावा केला. दहशतवादी केवळ निष्पाप लोकांची हत्या करत नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या मानसिकतेचेही नुकसान करतात, असा आरोपही त्यांनी केला. याचवेळी त्यांनी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशावरील पाकिस्तानच्या टिप्पणीलाही फेटाळून लावत इस्लामाबादने आपले लक्ष त्यांच्या बेकायदेशीर ताब्यातील प्रदेशांवर आणि तेथे होत असलेल्या घडामोडींवर केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला दिला. भारताच्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात नाक खुपसण्याऐवजी रावळकोटसारख्या त्यांच्या बेकायदेशीर ताब्यातील प्रदेशांवर पाकिस्तानने लक्ष केंद्रित केले पाहिजे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची संख्या सातत्याने कमी होत असून त्यांच्या हक्कांचे दररोज उल्लंघन होत आहे. जो देश स्वत:च्या अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही, त्याला भारताला उपदेश करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही मंगलानंदन यांनी सुनावले.
स्वत:च्याच सैनिकांना स्वीकारण्यास नकार
एक अनुभवी राजनयिक असलेल्या मंगलानंदन यांनी 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या आपल्याच सैनिकांचे मृतदेह स्वीकारण्यास पाकिस्तानने दिलेल्या नकाराची आठवण करून दिली. ज्या देशाने आपल्याच शहीद सैनिकांना स्वीकारण्यास नकार दिला, तोच देश आता श्रद्धा, धार्मिक स्वातंत्र्य आणि दफनविधीच्या परंपरांबद्दल आवेशपूर्णपणे बोलतोच कसा? अशी विचारणाही त्यांनी केली. भारतीय लष्करानेच अनेक पाकिस्तानी सैनिकांना संपूर्ण लष्करी सन्मानाने आणि इस्लामी रितीरिवाजानुसार दफन केले होते, असेही त्या पुढे म्हणाल्या.
