भारत 4-जी मध्ये मागे, 5-जीमध्ये जगासोबतच्या शर्यतीत
आता 6-जी मध्ये नेतृत्व करण्याच्या तयारीत : मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारत 4 जी नेटवर्कमध्ये मागे होता, 5जी मध्ये जगासोबतच्या शर्यतीत उतरला आहे. परंतु आगामी काळासाठी आता 6 जी मध्ये नेतृत्व करण्याची तयारी करत आHहे, असे दळण-वळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.
5 जी नंतर आता भारत 6 जी च्या शर्यतीत जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत आहे. दळण-वळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 2030 पर्यंत 5 जी वापरकर्त्यांची संख्या सध्याच्या 55 कोटींवरून 1 अब्जपर्यंत वाढवण्याचे भारताचे ध्येय असल्याचेही मंत्री सिंधिया यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, जो देश एकेकाळी 4 जीच्या बाबतीत जगाच्या मागे होता, त्याने आता 6जी मध्ये जगाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 च्या 10 व्या आवृत्तीचे उद्घाटन करताना सिंधिया यांनी हे सांगितले. ते म्हणाले की, भारतात 5 जी तंत्रज्ञान स्वीकारण्याचा वेग जगात सर्वात जलद आहे
6जी मध्ये जगाचे नेतृत्व करण्याची भारताची इच्छा
सिंधिया यांनी 6जी तंत्रज्ञानाबाबत भारताच्या महत्त्वाकांक्षाही स्पष्ट केल्या. ते म्हणाले की, भारताने 6 जी क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी देशातील तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित संस्थांमध्ये काम सुरू आहे.
इंडिया 6जी अलायन्सकडे 7,700 पेटंट
सिंधिया यांच्या मते, इंडिया 6जी अलायन्समध्ये 90 संस्थांचा समावेश आहे. या अलायन्सने आतापर्यंत 7,700 पेटंट मिळवले आहेत. यापैकी 4,400 आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत. हे 6जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि नवनिर्मितीसाठी भारताचे प्रयत्न दर्शवते.
2030 मध्ये आयटीयूची मोठी परिषद होणार भारतात
ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) परिषदेने 2030 मध्ये पूर्णाधिकार परिषद आयोजित करण्याचा भारताचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ते म्हणाले की, आयटीयूची जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा (डब्ल्यूटीएसए) 2024 मध्ये भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या मते, आयटीयूच्या इतिहासात जिनिव्हाबाहेर आयोजित केलेली ही सर्वात मोठी डब्ल्यूटीएसए होती.
ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 6 कोटींवरून 110 कोटींहून अधिक झाली आहे
सिंधिया यांनी सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या पहिल्या इंडिया मोबाईल काँग्रेसपासून आतापर्यंतच्या भारताच्या दूरसंचार प्रवासाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, या काळात देशातील ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 6 कोटींवरून 110 कोटींहून अधिक झाली आहे. ते म्हणाले की, भारतात आता 135 कोटी मोबाईल ग्राहक आहेत. म्हणजेच, गेल्या काही वर्षांत मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची व्याप्ती वेगाने वाढली आहे.
4जी मध्ये मागे, 5जी मध्ये जगाच्या बरोबरीने आणि 6जी मध्ये नेतृत्वाचे ध्येय
सिंधिया यांनी भारताच्या मोबाईल तंत्रज्ञानाच्या प्रवासाचे तीन टप्प्यांत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 4जी च्या बाबतीत भारत जगाच्या मागे होता, तर 5जी मध्ये भारताने जगाच्या बरोबरीने वाटचाल करण्यास सुरुवात केली. आता देशाचे ध्येय एक पाऊल पुढे टाकून 6जी च्या बाबतीत जगाचे नेतृत्व करण्याचे आहे.
