भारत-कझाक फुटबॉल लढत बरोबरीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कझाकस्थानच्या दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या 20 वर्षीय वयोगटातील महिलांच्या फुटबॉल संघाने येथे खेळविण्यात आलेला मित्रत्वाचा फुटबॉल सामना 1-1 असा बरोबरीत सोडविला. भारतीय महिला फुटबॉल संघाने या दौऱ्यातील गेल्या शनिवारी झालेला पहिला सामना 3-2 अशा फरकाने जिंकला होता.
दुसऱ्या सामन्यात खेळाच्या पूर्वाधार्थ दोन्ही संघांनी गोल करण्याच्या सोप्या संधी वाया घालविल्या. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. उत्तराधार्थातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला म्हणजे सामन्यातील 47 व्या मिनिटाला अॅडेलीया बेकोझीनाने कझाकचे खाते उघडले. 55 व्या मिनिटाला भारतीय संघातील पूजाने शानदार गोल नोंदवून हा सामना 1-1 असा बरोबरीत राखला. पूजाचा हा दुसरा गोल आहे. तिने या दौऱ्यात दोन सामन्यात दोन गोल केले आहेत. 2026 साली होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाला सराव मिळावा याकरिता अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने कझाकस्थानचा दौरा आयोजित केला होता.