भारत-इस्रायल पंतप्रधानांचा दूरध्वनीवर सुसंवाद
संरक्षणासह दहशतवादाशी संबंधित मुद्यांवर चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांचे इस्रायली समकक्ष बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर चर्चेचा संदर्भ देत ‘येत्या वर्षात भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल’ असा दावा केला आहे. तसेच त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा शांतता योजनेच्या लवकर अंमलबजावणीसह या प्रदेशात न्याय्य आणि कायमस्वरूपी शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा सांगितले.
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेतान्याहू यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची माहिती शेअर केली. ‘माझे मित्र, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलणे आनंददायी होते. मी त्यांना आणि इस्रायलच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. येत्या वर्षात भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. आम्ही प्रादेशिक परिस्थितीवरही विचारांची देवाण-घेवाण केली आणि दहशतवादाविरुद्ध अधिक जोमाने लढण्याचा आमचा सामायिक संकल्प पुन्हा व्यक्त केला’, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान आणि इस्रायलच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक परिस्थितीवरही चर्चा केली. यापूर्वी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2025 रोजी फोनवरून चर्चा केली होती. पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना फोन करत दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारीतील सततच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांनी परस्पर फायद्यासाठी हे संबंध आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाबद्दल कोणतीही उदारता न दाखवण्याच्या त्यांच्या धोरणाचा पुनरुच्चार केला.
इस्रायली पंतप्रधान डिसेंबर 2025 मध्ये भारताला भेट देणार होते, परंतु काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला होता. इस्रायली पंतप्रधानांचा भारत दौरा पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ होती. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला असल्याने, त्यांच्या भेटीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते.