भारतच सर्वात वेगवान अर्थव्यवस्था !
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेचा निर्वाळा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत हीच जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असा निर्वाळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 या कालावधीत भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर 7 टक्के इतका राहील, असे अनुमान या संस्थेने बुधवारी व्यक्त केले आहे. तसेच भारतातील महागाई दरही 4.4 टक्क्यांपर्यंत खाली येईल, असेही भाकित करण्यात आले आहे.
भारतात सध्या निवडणुकांचा मोसम आहे. असे असूनही वित्तीय एकत्रीकरण प्रक्रिया योग्य मार्गावर अग्रेसर आहे. भारताकडचा विदेशी चलन साठाही समाधानकार आहे. स्थूल आर्थिक पायाचा विचार करता भारताची स्थिती चांगली असल्याचे दिसून येते. मात्र, भारताने आर्थिक विकासाचा हा कल स्थायी राहण्यासाठी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वेगाने लागू करण्याची आवश्यकता आहे. तसेच रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अधिक रोजगार निर्माण करायचे असतील तर कामगार कायद्यांमध्ये सुधारणा लागू करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे उत्पादन केंद्रांमध्ये अधिक कामगारांना काम दिले जाऊ शकते. सध्या कामगार कायदे कडक असल्याने नव्या कामगारांची भरती टाळली जात आहे. या कायद्यांमध्ये सुधारणा झाल्यास कंपन्या, सेवाक्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र यांच्यात अधिक कामगार भरती केली जाईल. तसेच सध्या व्यापारावर असलेले बव्हंशी निर्बंध हटविणे हे भारतासाठी अनिवार्य असून त्यामुळे स्पर्धात्मक पद्धतीने व्यापार करण्s भारताला शक्य होईल, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
पायाभूत सुविधा अनिवार्य
भौतिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे भारताने दुर्लक्ष करता कामा नये. या दोन्ही क्षेत्रांमध्ये सुधारणांची गती आणखी वाढविल्यास भारताचा विकासदर अधिक वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता, भारताची आर्थिक वाटचाल योग्य मार्गावर होत असून आर्थिक ध्येये पूर्ण होण्याची शक्यता अधिक असल्याचे मत संस्थेने व्यक्त केले आहे.