भारत कौशल्याची राजधानी-प्रवासी दिनाचा संदेश
18 व्या भारतीय डायस्पोरा परिषदेचा महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश काय असेल तर भारताचे कौशल्य संवर्धन हा होय. भारत पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने मोठी गऊडझेप घेत आहे आणि यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो अनिवासी भारतीयांचा आहे.
1915 मध्ये 9 जानेवारी या दिवशी दक्षिण आफ्रिकेतून मोहनदास करमचंद गांधी भारतामध्ये परतले आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व त्यांनी हाती घेतले. टिळक युगाचा अस्त आणि गांधींचा उदय हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे पर्व होते. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 साली हा दिवस ‘प्रवासी भारतीय दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. दर दोन वर्षांनी यासाठी विदेशातील भारतीयांना निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत एक मोठी परिषद घेतली जाते. या परिषदेचे 18 वे अधिवेशन ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे 8 व 10 जानेवारी या तीन दिवसात संपन्न झाले. सबंध जगामध्ये राहणार या अनिवासी भारतीयांची संख्या आता 3 कोटी 5 लाखापर्यंत पोहोचली आहे आणि अमेरिकेतील पदवीधरांमध्ये 14 टक्के पदवीधर हे भारतीय पदवीधर आहेत. 2023 मध्ये भारतीयांचे सकल घरेलु उत्पन्न 2497 डॉलर्स एवढे होते तर अमेरिकेत राहणार या भारतीयांचे सकल घरेलु उत्पन्न 2023 मध्ये 1,66,200 डॉलर्स एवढे होते आणि हे उत्पन्न अमेरिकन नागरिकांच्या 77,600 डॉलर्स या सकल घरेलु उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. याचा अर्थ असा की जगाच्या ज्या ज्या देशात भारतीय राहतात त्या त्या देशात भारतीयांनी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेस मोलाची बैठक दिली आहे. शिवाय त्यांनी आपल्या देशातील मातृभूमीतील कुटुंबियांसाठी दर महिन्याला बचत करून काही रकमा पाठवून त्यांचेही ऋण फेडले आहे. गतवर्षी भारतामध्ये अनिवासी भारतीयांकडून आलेल्या अशा रकमेची किंमत किती आहे? पाकिस्तान आणि बांगलादेश या दोघांच्याही अर्थव्यवस्थेची बेरीज केली तर त्याहीपेक्षा अधिक रक्कम अनिवासी भारतीय आपल्या मातृभूमीसाठी पाठवितात. यावरून भारताच्या आर्थिक विकासात अनिवासी भारतीयांचे योगदान किती मोठे आहे हे लक्षात येते. त्यामुळे या वर्षीच्या परिषदेचा विषय ‘विकसित भारतामध्ये अनिवासी भारतीयांचे म्हणजे डायस्पोराचे योगदान’ हा होता. या तीन दिवसीय परिषदेतील विचार मंथनाचा केंद्रबिंदू भारताच्या विकासात डायस्पोरांचे सक्रिय योगदान हा होता. याबाबत सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक पैलूंचा विचार करण्यात आला आणि काही संकल्पही सिद्ध करण्यात आले.
विकसित भारत - पथदीप
2047 मध्ये भारत एक विकसित देश असेल. आज दाट लोकसंख्येचा आणि समस्यांनी ग्रासलेला देश असला तरी देखील पुढील काळात या देशाला जगाचे नेतृत्व करावयाचे आहे. या दृढ निश्चयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांच्या या प्रयत्नास समर्थन म्हणून प्रस्तुत परिषदेत गांभीर्याने चिंतन करण्यात आले. या परिषदेचे अपूर्व यश सबंध जगाचे लक्ष वेधणारे ठरले. जगाच्या कुठल्याही देशातील एवढे अनिवासी जगातील अन्य देशामध्ये नसतील. कांगोपासून युगांडापर्यंत, अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत आणि इंग्लंडपासून सूरीनामपर्यंत कितीतरी देशामध्ये भारतीयांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय नागरिक तेथील सामाजिक व आर्थिक जीवनात तर अग्रेसर आहेतच शिवाय त्यांनी आता तेथील राजकारणातही आपला जम बसविण्यास सुरूवात केली आहे. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे नेते इंग्लंडच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. अमेरिकेमधील कमला हॅरिस उपाध्यक्ष झाल्या. अशी कितीतरी उदाहरणे जगामध्ये आहेत की अनिवासी भारतीयांनी आता जगात नेतृत्वाला सुद्धा प्रारंभ केला आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात भारत प्रगतीची नवी झेप घेत आहे. त्यात अनिवासी भारतीय आपले बौद्धिक, शैक्षणिक आणि आर्थिक सामर्थ्याचे योगदान देऊन देशाला मोठे करण्याचे स्वप्न पहात आहेत आणि आपलाही खारीचा वाटा देशाच्या विकासात मोठ्या आत्मविश्वासाने उचलत आहेत.
नवे सूत्र नवी मांडणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात डायस्पोरांना सहभागी करून घेण्यासाठी नवे सूत्र दिले आणि नवी मांडणी केली. विदेशात राहणाऱ्या भारतीयांना भारताच्या राष्ट्रीय विकासात एकाग्र करणे, विकास कल्पनांचा पाठपुरावा करणे आणि त्यांना परिवर्तनासाठी सिद्ध करणे ही तीन सूत्रे घेऊन त्यांनी आपल्या भाषणात दोन महत्त्वाचे दृष्टिकोन मांडले. आगामी दशकामध्ये भारत जगाची कौशल्य राजधानी बनण्याच्या मार्गावर आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना कौशल्याची जी मागणी होत आहे ती पूर्ण करण्याचे काम आपल्या दोन्ही हातांनी अनिवासी भारतीय भरभरून करीत आहेत. भारत डायस्पोरांच्या या कौशल्यवृद्धी अभियानात गती देऊन त्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि शहाणपणाचा दुहेरी लाभ उभय देशांना प्रदान करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्लोबल वर्क फोर्स म्हणजे जागतिक शक्ती निर्माण करणे, कार्यशक्ती निर्माण करणे ही भारताची दृष्टी आहे. ते कुठेही असले तरी प्रवासी भारतीयांना मदत करणे ही आम्ही आमची जबाबदारी मानतो असे सूत्र घेऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. त्यांनी आपल्या भाषणाचा आलेख पुढे नेत तीन मुद्दे मांडले. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या विकासात अनिवासी भारतीयांची मोठीच भागीदारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत जगाची कौशल्य राजधानी बनत आहे आणि त्यात त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे अनिवासी भारतीयांचे मोठेपण असे की, ते भारतीय मूल्ये व भारतीय संस्कृतीचा वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात निष्ठेने पोहोचवित आहेत. जे कार्य स्वामी विवेकानंदांनी केले त्याच कार्याची धुरा ते पुढे वाहत आहेत. यावेळच्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाच्या अध्यक्षा, महामहिम क्रिस्टीन कार्ला कांगालू या होत्या. त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात भारतीयांच्या प्रेमळ आणि लाघवी स्वभावाबद्दल आणि विश्वाला पुढे घेऊन जाण्याच्या भावनेबद्दल विशेष नोंद केली. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी मांडलेल्या सूत्राचा पुढे अन्वयार्थ लावताना असे म्हणता येईल की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रवासी भारत दिवसाचे महत्त्व असे की, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतीय संस्कृती आणि कोट्यावधी भारतीय यांचा सुवर्णबंध मजबूत करणारी ही संकल्पना आहे. भारतामध्ये सण, समारंभ आणि उत्सवांच्या प्रेरक वातावरणाच्या संक्रमण काळात प्रवासी भारतीयांचा पदस्पर्श भारतात होत आहे हा एक योगायोग नव्हे तर पूरक बाब आहे. याच काळात प्रवासी भारतीयांसाठी विशेष सांस्कृतिक दर्शन घडविणारी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. तिचाही लाभ प्रवासी भारतीयांना आता यापुढे नियमित होत राहील. सांस्कृतिक परंपरा आणि विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये सुवर्णमध्य सांधणारा हा उपक्रम आहे. शिवाय भारत आणि भारतीय यांच्यामधील पूल मजबूत करण्याचे काम या संमेलनानी मागील 17 वर्षात केले आहे. इंदूर येथील संमेलनात जे मंथन झाले त्याचा वारसा भुवनेश्वर अधिक भक्कमपणे पुढे नेत आहे. ही मैत्रीची मशाल विकासाची नवी पहाट घडविणार असा अनिवासी भारतीयांना मोठा विश्वास वाटतो.
डायस्पोरा हे भारतीय संस्कृतीचे राजदूत आहेत. त्यांनी भारतीयांची मूल्ये, प्रेरणा आणि संस्कार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले आहेत. जगाच्या अनेक देशातील नेत्यांनी भारतीय डायस्पोराच्या परिश्रमाचे, योगदानाचे आणि त्यांच्या सेवाकार्याचे मुक्त कंठानी कौतुक केले. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत ही जगातील लोकशाहीची जननी आहे. लोकशाही हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. जीवनाचा मार्ग बनत आहे. ज्यामुळे आम्ही जगाच्या ज्या ज्या भागात जाऊ त्या त्या भागात लोकशाही स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे गीत गात राहू हाच यामागील खरा गभितार्थ होय.
समारोप
18 व्या भारतीय डायस्पोरा परिषदेचा महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश काय असेल तर भारताचे कौशल्य संवर्धन हा होय. अंतराळ संशोधन असो, सागर संशोधन असो की कृत्रिम बुद्धिमत्ता असो या सर्व क्षेत्रात भारत मोठी झेप घेत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात भारताचे हे प्रगतीशील सामर्थ्य अधिक भक्कम करण्याची जबाबदारी जशी डायस्पोराची आहे तशी त्यांची काळजी वाहणे ही भारताची सुद्धा जबाबदारी आहे. हे सूत्र येथे महत्त्वाचे वाटते. गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. भारत पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने मोठी गऊडझेप घेत आहे आणि यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो अनिवासी भारतीयांचा आहे. भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला टप्प्याटप्प्यावर पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक भारतीय जसे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणून झटत आहेत तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात असलेले भारतीय सुद्धा मातृभूमीच्या विकासासाठी तेवढ्याच तत्परतेने पुढे सरसावत आहेत.
अक्षय ऊर्जा, विमान वाहतूक, इलेक्ट्रीक मोबिलीटी या क्षेत्रात भारत नवे विक्रम प्रस्थापित करीत आहे. मोबाईल निर्मितीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जगातील दुसरे मोठे मेट्रो नेटवर्क भारतात आहे. शिवाय भारत मोटार उद्योगात सुद्धा नवा विक्रम प्रस्थापित करण्यास पुढे सरसावत आहे. भारतातील रस्ते आणि त्यांची प्रगती ही सुद्धा त्याच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची जीवनरेखा बनत आहे. भारत आता स्वबळावर लढाऊ विमाने निर्माण करण्यात सुद्धा पुढे सरसावत आहे, अग्रेसर आहे. स्किलींग, रि-स्किलींग आणि अप-स्किलींग हा नव्या युगाचा मंत्र आहे. या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व जर्मनी किंवा इंग्लंड नव्हे तर भारत करणार कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सुद्धा भारत सबंध जगात सेमी कंडक्टर क्षेत्रासह पुढे आहे.
काही अनिवासी भारतीय तर सातव्या पिढीत आहेत. सूरीनाम, माटिनिक आणि ग्वाडेलो मधील भारतीयांचे विशेष कौतुक केले पाहिजे. कारण ते आता सातव्या पिढीतून आठव्या पिढीत त्या देशांचे भवितव्य घडवीत आहेत. शिवाय काही देशात सहाव्या पिढीतील अनिवासी भारतीय सुद्धा इतिहासात नवे पान लिहित आहेत. विकास आणि वारसा हा नव्या युगाचा मंत्र आहे. आणि भारतीयांनी या संदर्भात दिलेले योगदान भविष्यातही असेच भक्कम राहिल यात शंका नाही. भारतीयांनी विकासाचा वारसा जोपासला आहे आणि विकासाचे मौलिक अमृत मातृभूमीतील बांधवांनाही प्रदान केले आहे. 1937 साली बिर्ला भवनमध्ये केलेल्या भाषणात महात्मा गांधींनी कौशल्य विकासातच उद्याच्या भारताचे भविष्य सामावले आहे असे म्हटले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य वृद्धीवर भर दिला आहे. त्यामुळे भारत जगाला प्रगत मनुष्यबळ पुरविणारा देश बनला आहे. पर्यायाने, आधुनिक जगाची कौशल्य राजधानी म्हणून भारताचे वैभव भविष्यात शिखरावर पोहोचेल यात शंका नाही.
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर