For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अणुइंधन निर्मितीत भारत आत्मनिर्भर

06:55 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
अणुइंधन निर्मितीत भारत आत्मनिर्भर
Advertisement

कल्पाक्कम अणुभट्टीत प्रयोग, भारताला मोठे यश

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, कुडनकुलम

स्वत:ला आवश्यक असणारे अणुइंधन स्वत: निर्माण करण्यात भारताने यश मिळविले आहे. तामिळनाडूच्या कल्पाक्कम अणुभट्टीत हा प्रयोग यशस्वीरित्या करण्यात आला आहे. या इंधननिर्मितीसाठी नियंत्रित स्वरुपाच्या आण्विक रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता असते. भारताने हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे.

Advertisement

भारताची ऊर्जा आवश्यकता स्वबळावर पूर्ण करण्याचा प्रयत्न भारत करीत आहे. अणुऊर्जेच्या क्षेत्रावर यासाठी भारताने विशेष भर दिला आहे. भारताने अणुऊर्जानिर्मितीसाठी 2047 पर्यंत 100 गीगावॅटस्चे लक्ष्य निर्धारित केले आहे. मात्र, ते साध्य करण्यासाठी भारताला अणुइंधन निर्मितीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. कल्पाक्कमच्या अणुभट्टीत भारताच्या संशोधकांनी या प्रयोगाचा प्रारंभ केला. ही अणुभट्टीही स्वदेशनिर्मितच आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने संशोधकांचा उत्साह दुणावला असून भविष्यकाळात मोठ्या प्रमाणावर अणुइंधनाची निर्मिती करणे आता भारताला सहजसाध्य होणार आहे. अणुइंधननिर्मितीच्या संदर्भात आत्मनिर्भर असणारे केवळ पाच देश सध्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन

या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. कल्पाक्कम येथे भारताच्या प्रोटोटाईप फार्स्ट ब्रीडर रिअॅक्टरमध्ये हा प्रयोग केला जात असून तो आता अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. अर्थात अद्यापही काही प्रयोग करावे लागणार आहेत. मात्र, भारताला आतापर्यंत मिळालेले यश अतिशय महत्वाचे असून भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे, असे निश्चितपणे म्हणता येते, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे.

थोरियमचा उपयोग

अणुइंधन निर्मितीसाठी भारताने आपल्या भूमीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या थोरियम या मूलद्रव्याचा उपयोग केला आहे. या मूलद्रव्यापासून अणुइंधन निर्माण करण्याची प्रक्रिया जटील असते. पण भारताच्या संशोधकांनी हे साध्य करुन दाखविले आहे. आता भारताला आपल्य्ााकडच्या प्रचंड थोरियम साठ्याचा उपयोग करता येईल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

अद्याप वीजनिर्मिती नाही, पण...

कल्पाक्कम येथील अणुभट्टीतून अद्याप वीजनिर्मितीस प्रारंभ झालेला नाही. तथापि, इंधननिर्मितीची रासायनिक प्रक्रिया यशस्वी झाल्याने वीजनिर्मितीस लवकरच प्रारंभ होईल. वीजनिर्मितीस प्रारंभ झाल्यानंतर हा प्रयोग पूर्णत: यशस्वी झाला, असे म्हणता येणार आहे. पण तो क्षण आता नजीक आला आहे. त्यामुळे भारताने या क्षेत्रात हे मोठे पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त केली जात आहे.

भारताचे कौतुकास्पद यश

ड अणुइंधन निर्मितीचे तंत्रज्ञान विकसीत करण्यात भारताला मोठे यश

ड कल्पाक्कमच्या स्वदेशनिर्मित अणुभट्टीत इंधननिर्मिती प्रयोग यशस्वी

ड या अणुभट्टीतून लवकरच वीजनिर्मितीस प्रारंभ होणार असल्याचे वृत्त

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारताच्या संशोधकांची मोठी प्रशंसा

Advertisement
Tags :

.