For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया आघाडीला नेताच नाही!

06:54 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडिया आघाडीला नेताच नाही
Advertisement

पंतप्रधान मोदींची चिक्कबळ्ळापूरमधील सभेत टिप्पणी : पुन्हा एका रालोआ सत्तेवर येण्याचा विश्वास

Advertisement

 प्रतिनिधी / बेंगळूर

काँग्रेस नेतृत्त्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला नेताच नाही; दूरदृष्टीही नाही. त्यांना घोटाळ्यांचा इतिहास आहे, अशी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर  हल्लाबोल केला. शनिवारी चिक्कबळ्ळापूर आणि कोलार मतदारसंघातील उमेदवारांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते सहभागी झाले. यावेळी त्यांनी ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा करून देशात पुन्हा एकदा रालोआचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Advertisement

ते म्हणाले, आपल्याला सत्तेवरून हटविण्यासाठी मोठमोठ्या शक्ती प्रयत्नशील आहेत. मात्र, नारीशक्ती, मातृशक्तीचा आशीर्वाद आणि जनतेचे सुरक्षाकवच आपल्यासोबत आहे. माता-भगिनींच्या सेवेसाठी आपले प्राधान्य आहे. मी येथे रिपोर्ट कार्ड घेऊन मते मागण्यासाठी आलो आहे. मी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम केले आहे. तुमची स्वप्ने हीच हाच मोदींचा संकल्प आहे. अहोरात्र परिश्रम करून 2047 पर्यंत देशाची धुरा सांभाळण्याची गॅरंटी देत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

आम्ही गरिबांना मोफत रेशनधान्य दिले आहे. कोट्यावधी लोकांना याचा लाभ मिळत आहे. आणखी पाच वर्षे ती सुरू राहणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. आयुष्मान कार्डद्वारे लोकांना मोफत उपचाराची सुविधा दिली आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसींना आपल्या सरकारने अधिकाधिक लाभ मिळवून दिला आहे. या समुदायांना शिक्षण क्षेत्रात प्राधान्य देण्यात आले आहे. मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखाऐवजी यापुढे 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. केंद्र सरकारने पाणी सुविधा पुरविण्यासाठी घरोघरी नळजोडणी केली, मागील 10 वर्षात 25 कोटी बीपीएल कुटुंबांचे जीवनमान सुधारले, घरे नसणाऱ्यांना निवारा उपलब्ध करून दिला आहे. पुढील 10 वर्षात 3 कोटी घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट आहे.

काँग्रेसच्या काळात भजन करणाऱ्यांवर हल्ले

अलीकडे कर्नाटकात आमच्या मुलींवर हल्ला होत आहे, रस्त्यावर बॉम्बस्फोट होत आहेत, भजन-कीर्तन करणाऱ्यांवर हल्ले होत आहेत. ही बाब साधारण नाही. काँग्रेस ज्या विचारधारेचे समर्थन करत आहे, ती धोकादायक आहे. काँग्रेस सरकारने काही महिन्यातच बेंगळूरची परिस्थिती बिघडवली आहे. टेक सिटी असणाऱ्या बेंगळूरला टँकर सिटी बनविले आहे. जनतेच्या समस्यांची काँग्रेस सरकारला कदर नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) च्या बाबतीत काँग्रेसने अनेक आरोप केले. आपली बदनामी करण्याचे कारस्थान काँग्रेसने रचले. परंतु याच एचएएलने मोठी कामगिरी केली आहे. राज्यात मोठे हेलिकॉप्टर निर्मितीचे केंद्र सुरू केले आहे. काँग्रेस तंत्रज्ञानविरोधी आहे. देशाच्या ‘डिजिटल इंडिया’चे संपूर्ण जगभरात कौतुक होत आहे, असेही मोदी म्हणाले.

Advertisement
Tags :

.