भारत बनवतोय अमेरिकेपेक्षा भेदक बाँब
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचा बंकर बस्टर बाँब जगातील सर्वात भयानक मानला जात आहे. तथापि, भारत आता या बाँबपेक्षाही घातक आणि भेदक असा बंकर भेदी बाँब निर्माण करत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. भारताचा हा बाँब भूमीखाली 100 मीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त खोलीवर असणारी भुयारे, बंकर्स किंवा तळघरे यांचा भेद करु शकणार आहे. या बाँबची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून केली जात आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
अमेरिकेने आपल्या बंकर भेदी बाँब्जच्या साहाय्याने इराणची भूमीखाली असणारी अणुकेंद्रे उध्वस्त केल्याचे प्रतिपादन नुकतेच केले आहे. अमेरिकेचा बाँब भूमीखाली 80 मीटर असणाऱ्या लक्ष्याचा भेद करु शकतो. मात्र, भारताने याहीपेक्षा अधिक खोल असलेली लक्ष्ये भेदणाऱ्या बाँबच्या निर्मितीवर कामाला प्रारंभ केला आहे. लवकरच असा बाँब निर्माण करण्यात यश येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
अग्नी 5 वर आधारित
भारताने पाच हजार किलोमीटर अंतरावर मारा करु शकेल, असे अग्नी 5 हे क्षेपणास्त्र विकसीत केले आहे. याच क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानाची सुधारित आवृत्ती म्हणजे हा बाँब असेल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हा बाँब भूमीखाली मोठ्या अंतरावर जाऊ शकतो. काँक्रीट किंवा पोलादी कवच, मग ते कितीही जाडीचे आणि दणकट असले तरी, ते भेदू शकतो, असे या प्रस्तावित बाँबसंबंधी बोलले जात आहे. मात्र, या प्रकल्पासंबंधी यापेक्षा सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. काही तज्ञांच्या मते भारत असा बाँब निर्माण करण्याच्या अगदी जवळ पोहचलेला आहे. लवकरच, असा बाँब निर्माण करण्यात भारताला यश आल्याची शुभवार्ता भारतीयांच्या कानी पडेल, अशी शक्यता आहे. असा बाँब निर्माण करण्यात यश आल्यास भारताच्या सामरिक बळात प्रचंड वाढ होणार आहे. तसेच असे भेदक बाँब भारतातच निर्माण झाल्यास भारताचे विदेशांवरचे अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे, असे निश्चितपणे मानण्यात येत आहे.