For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्करोग उपचारातही भारत आत्मनिर्भर !

06:12 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्करोग उपचारातही भारत आत्मनिर्भर
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

कर्करोगावरील उपचारांमध्ये लवकरच भारत आत्मनिर्भर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात संशोधकांनी सीएआर-टी पेशी उपचार पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळविले असून एका रुग्णाला खडखडीत बरेही केले आहे. यामुळे उपचारांचा खर्च 4 कोटी रुपयांवरुन 40 लाखांवर आला आहे. टाटा मेमेरियल रुग्णालयातील संशोधक डॉ. हसमुख जैन आणि त्यांचे सहकारी यांनी या उपचार पद्धतीचे संशोधन केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या उपचारपद्धतीला काही महिन्यांपूर्वी भारताच्या औषध नियमन प्राधिकरणाने मान्यता दिली होती. त्यानंतर रीतसर रुग्णांवर या पद्धतीच्या माध्यमातून उपचार करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. निवृत्त कर्नल डॉ, व्ही. के. गुप्ता यांच्यावर उपचार करण्यात आले होते. ते आता पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे भारतात विकसीत झालेले हे तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी, अधिक रुग्णांवर आता या तंत्रज्ञानाच्या आधाराने उपचार करणे शक्य झाले आहे.

Advertisement

विदेशात उपचारांचा खर्च प्रचंड

अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्ये हे तंत्रज्ञान पूर्वीच विकसीत करण्यात आले होते. तथापि, तेथे जाऊन उपचार घेणे केवळ अतीश्रीमंत भारतीयांनाच शक्य होते. कारण या उपचारांचा खर्च 4 कोटी ते 5 कोटी रुपये इतका आहे. तथापि, भारतीय संशोधकांनी आता स्वबळावर ते विकसीत केल्याने खर्च 40 लाखांपर्यंत आला आहे. नजीकच्या भविष्यकाळात तो याहीपेक्षा बराच कमी होईल आणि सर्वसामान्यांनाही हे उपचार घेणे शक्य होईल, असे तज्ञांचे मत आहे.

काय आहे तंत्रज्ञान

या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शरीरात निर्माण होणाऱ्या टी पेशींना कर्करोगाच्या पेशींशी संघर्ष करण्याची क्षमता प्रदान केली जाते. टी पेशी या रोगप्रतिकारक पेशी असतात. पण कित्येकदा त्या कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यास असमर्थ असतात. अशा स्थितीत हे तंत्रज्ञान महत्वाचे ठरते. ही उपचार पद्धती क्रांतीकारक मानली जात आहे. कारण या पद्धतीत रुग्णाला फारसा त्रास होत नाही.

भारतातील नामकरण

भारतात विकसीत करण्यात आलेल्या या उपचारपद्धतीचे नामकरण एनईएक्ससीएआर 19 असे करण्यात आले आहे. ती बी-पेशींच्या कर्करोगासाठी उत्तम उपचार मानली जात आहे. या प्रकारचा कर्करोग माणसाच्या रोगप्रतिकारयंत्रणेत निर्माण होत असतो. विशेषत: रक्तक्षय किंवा ल्युकेमिया या जीवघेण्या कर्करोगावर ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी मानली जात आहे.

औषध नियंत्रकाची मान्यता

भारताच्या औषध नियंत्रक प्राधिकरणाने या भारतनिर्मिती उपचार पद्धतीला ऑक्टोबर 2023 मध्ये व्यापारी उपयोगासाठी मान्यता दिली होती. सध्या ही उपचार पद्धती भारतातील 10 शहरांमधील 30 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. बी-पेशींच्या कर्करोगाने त्रस्त अशा 15 वर्षे वयाहून अधिक वयाचे रुग्ण या उपचार पद्धतीसाठी पात्र आहेत. कर्नल डॉ. गुप्ता हे तीव्र लिंफोब्लास्टिक ल्यूकेमिया या वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाचे रुग्ण होते. हा रोग शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या घटवितो. त्यामुळे रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती नष्ट होते. मात्र, गुप्ता यांच्यावर या उपचार पद्धतीचा चांगला परिणाम होऊन ते आता पूर्ण बरे झाले आहेत.

आणखी प्रयोगांची आवश्यकता

या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किती काळ रुग्ण कर्करोगमुक्त अवस्थेत राहू शकतो यासंबंधी माहिती कालांतराने समजणार आहे. डॉ. गुप्ता हे बरे झालेले प्रथम रुग्ण असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रदीर्घ काळ ते कर्करोग मुक्त राहिले तर ही पद्धती पूर्ण यशस्वी झाली असे म्हणता येणार आहे. असे असले तरी भारताच्या संशोधकांनी या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात मोठी प्रगती साधली आहे वहे निश्चित मानले जात आहे. भविष्यात ही पद्धती अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने संशोधन होणारच आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.