युरोपचा इंधन पुरवठादार ठरतोय भारत
सौदी अरेबियाला टाकणार मागे : देशाच्या निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनांची हिस्सेदारी 17 टक्के
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत युरोपमध्ये इंधनाचा प्रमुख पुरवठादार ठरत आहे. कोरोना महामारीदरम्यान युरोपचे तेलशुद्धीकरण प्रकल्प बंद झाल्याने आणि त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला युरोपमध्ये इंधन पुरवठ्याच संधी मिळाली. रशियाकडून स्वसत दरात कच्च्या तेलाची खरेदी आणि मग विविध वाहनांसाठी उपयुक्त इंधनात ते बदलून भारत पेट्रोलियम उत्पादनांचा एक निर्यातदार ठरला आहे. याचमुळे सामग्रीच्या निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनांची हिस्सेदारी 17 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.
5 वर्षांपूर्वी ही हिस्सेदारी 12 टक्क्यांच्या आसपास होती. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-सप्टेंबरमध्ये भारताची सामग्री निर्यात 213 अब्ज डॉलर्सची राहिली आणि यातील 36.5 अब्ज डॉलर्सची निर्यात पेट्रोलियम पदार्थांची राहिली आहे. मागील तीन वर्षांमध्ये नेदरलँड, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे यासारख्या देशांनी भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी केली आहे.
पेट्रोलियम उत्पादनांमुळेच युरोपच्या अनेक देशांमध्ये भारताच्या निर्यातीत वाढ दिसून येत ओह. युरोपच्या देशांसोबत भारताकडून सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनाही पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली जात आहे. प्रुख युरोपीय देशांना आता भारताकडूनच पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा होत असल्याचे चित्र आहे.
नेदरलँडला सर्वाधिक प्रमाण
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताकडून नेदरलँडला होणाऱ्या निर्यातीत 65 टक्के हिस्सेदारी पेट्रोलियम उत्पादनांची आहे. नेदरलँडच्या भारताच्या पहिल्या 5 निर्यात बाजारपेठेत सामील झाला आहे. तर ब्रिटनला होणाऱ्या एकूण निर्यातीत 20 टक्के हिस्सेदारी पेट्रोलियम उत्पादनांची आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल-जुलै या कालावधीत ऑटोमोटिवह डिझेल फ्यूलच्या फ्रान्सला होणाऱ्या निर्यातीत 883 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात भारताने युरोपला 5.9 अब्ज डॉलर्सच्या पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली होती. तर मागील आर्थिक वर्षात हा आकडा 20 अब्ज डॉलर्सच्या पार गेला आहे. विविध जागतिक यंत्रणांनुसार युरोपमध्ये होणाऱ्या एकूण पेट्रोलियम आयातीत भारताची हिस्सेदारी 12 टक्के आहे. अमेरिका आणि सौदी अरेबियाची हिस्सेदारी अनुक्रमे 21 आणि 17 टक्के आहे.
रशियन कच्च्या तेलाचा मोठा खरेदीदार
रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर अमेरिका तसेच युरोपीय देशांनी निर्बंध लादले आहेत. तेव्हापासून भारत हा रशियाकडून स्वस्त दरातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी सौदी अरेबिया, युएई, इराक यासारख्या देशांवर अवलंबून असलेला भारत आता जवळपास 40 टक्के कच्च्या तेलाची खरेदी रशियाकडून करत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत 49 टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल-जुलैदरम्यान रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत 26 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.