भारत-इराक महिला फुटबॉल सामना आज
वृत्तसंस्था / चियांगमेई (थायलंड)
2026 च्या एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे भारत आणि इराक यांच्यात ब गटातील सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची हुकमी विंगर सौम्य गुगुलोथ दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
2026 च्या एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्र फेरीच्या स्पर्धेतील गुणतक्त्यात भारतीय महिला संघ सध्या सहा गुणांसह तसेच सरस गोल सरासरीच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाने यापूर्वी झालेल्या सामन्यात मंगोलीयाचा 13-0 अशा गोलफरकाने पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात भारताने टिमोर-लेस्टीचा 4-0 असा फडशा पाडला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत आणि थायलंड यांनी समान 6 गुण घेतले असले तरी सरस गोल सरासरीच्या जोरावर भारताने थायलंडला मागे टाकले आहे. इराकने तीन सामन्यांतून 4 गुण घेतले आहेत. आगामी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेसाठी आपले आव्हान जिंकत ठेवण्यासाठी इराकला बुधवारच्या सामन्यात भारताला पराभूत करावे लागेल. भारत आणि थायलंड यांच्यातील या स्पर्धेतील सामना 5 जुलैला होणार आहे.